Bookstruck

जा, घना जा ! 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सुंदरदास यांचे असे भाषण झाले. आणखी काहींची झाली. सभा संपली.

सुंदरदासांनी सखारामची चौकशी केली.

“तुमच्यासारखे तपस्वी तर या संस्थेला हवे आहेत, रहा येथे. अभ्यास करा. तुम्हांला समाधान मिळो.” सुंदरदास म्हणाले.

“तुम्हांला समाधान आहे का?” सखारामने प्रश्न केला.

“ते काय सांगू?”

“तुम्हांला सर्वांभूती समभाव वाटतो का?”

“माझे अध्यात्म निराळे आहे. आपण काहीही केले तरी त्यापासून आपला आत्मा निराळा आहे ही जाणीव अंतरंगी जागृत ठेवणे याला मी वेदान्त समजतो. कर्माने आत्मा मळत नाही. ते कर्म सत्कर्म असो व दुष्कर्म असो; आत्मा सत् आणि असत् यांच्या पलीकडे आहे.”

“हे भयंकर तत्त्वज्ञान आहे! साधुसंतांची साधना का फोल? अद्वैताचा ज्यांनी अनुभव घेतला ते वाटेल तसे नव्हते वागत. त्यांच्या जीवनावरून जर वेदान्त समजून घ्यायचा असेल तर तुम्ही म्हणता त्याचा मेळ कसा घालायचा? शंकराचार्यांच्या भाष्याच्या आरंभीच मुळी म्हटले आहे की,- शम, दम, वगैरे सदगुण अंगी असल्याशिवाय कोठला वेदान्त? कोठले अद्वैत?”

“तुम्ही अजून या क्षेत्रात बाळ आहात.”

“मला बाळच राहू दे.” असे म्हणून प्रणाम करून सखाराम निघून गेला.

संस्थेच्या प्रमुखांना सुंदरदास म्हणाले, “हा तरुण निराळ्या वृत्तीचा दिसतो. हा केवळ चर्चाराम दिसत नाही!”

त्या दिवशी सखाराम आणि घना दूर फिरायला गेले होते. नदीच्या मध्यभागी असलेल्या एका खडकावर दोघे मित्र बसले होते. नदीच्या शंखासारखे स्वच्छ पाणी खळखळ करीत जात होते. तो शरद ऋतू होता. सायंकाळचा कोवळा गंभीर प्रकाश नदीच्या पाण्याजवळ खेळत होता. सूर्याचे किरण सायंस्नान आटोपून जणू पटापट जात होते.

“घना, चोहोबाजूंस पाणी असून मध्ये हा खडक आहे, त्याप्रमाणे जीवनात सर्वत्र निंदा-स्तुती, स्पर्धा, मानापमान यांचे वेगवान प्रवाह वाहत असतानाही आपल्याजवळ असा एखादा भक्कम आधार हवा,- जेथे आपण या सर्व गोष्टींपासून सुरक्षित असू; तेथे आपण परम शांती अनुभवू शकू.” सखाराम म्हणाला.

« PreviousChapter ListNext »