Bookstruck

घनाचा आजार ! 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“पारवी हावरी आहे काका.”

“तूच हावरा, तूच कावळा!”

“पारवी असे म्हणू नये. मी गाणे म्हणू ना?”

“म्हणा काका, म्हणा.”

सखाराम गाणे म्हणू लागला-
दह्या-दुधाने भरल्या वाट्या
वर साखल रायपुरी
असा माझा खेळे ग हरी।

“अशी माझी खेळे ग पारवी- असे म्हणा काका.” ती म्हणाली. 

“तुझे नाव नको, माझे हवे.” जयंता म्हणाला.

“तू मोठा आहे, मी लहान. माझे नाव हवे. होय ना काका?” पारवीने गळ्याला मिठी मारून म्हटले.

“होय हो. जयंता, तू जा शाळेत.” सखाराम म्हणाला.

जयंता शाळेत गेला. खेळत बोलत पारवी काकांजवळ झोपली. वैनीही काम-धाम आटोपून जरा पडली होती. मालती शिवणाच्या वर्गाला गेली होती.

सखाराम उठून आईजवळ जाऊन बसला. अलीकडे आईला बरे वाटत नसे जणू. ती माऊली सखारामची वाट पाहात होती. परंतु आणखी एक चिंता तिला होती. मालतीच्या लग्नाची!

“आई, तू आज रडत होतीस?” त्याने विचारले.

“कधी कधी डोळे येतात भरून. ते गेले नि मी मागे राहिले! तुझी ताईही गेली. झुरून झुरून ती मेली. ती तुझी आठवण काढी. माझा भाऊ कुठेही असो, सुखी असो, असे ती म्हणायची. जाऊ देत त्या गोष्टी. परंतु आता या मालतीचे कसे होणार? उगीच तिला दादाने इतके शिकवले. आपल्या समाजात शिकलेले मुलगे कमी. मालीला कोण घालील मागणी? नाकापेक्षा मोती जड, असे जो तो म्हणणार. मी सांगत होते की दोन बुके शिकली म्हणजे पुरे. परंतु तुझा मोठा भाऊ ऐकेना. तूही तसेच म्हणायचास. तू गेला निघून, त्याला वेळ नाही. माली किती दिवस अशी राहणार?” आई मुलाजवळ बोलत होती.

« PreviousChapter ListNext »