Bookstruck

घनाचा आजार ! 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणि आईने खरोखरच अंथरूण धरले. मालती तिच्याजवळ बसून असे. मुलीचा हात हातात घेऊन माता डोळे मिटून पडून असे.

“मालती सुखी हो. थोरामोठ्याची तू बायको होशील. मोटारीतून हिंडशील, तुझे दैव मोठे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. गरिबांना हिडिस-फिडिस नको कधी करू. नको अभिमान. नको ताठा. गोड बोल. नीट रीतीने वाग. देवधर्म करीत जा. बरे का?” माता निरवानिरव करीत होती.

जयेत, पारवी यांना तिने जवळ घेतले. सुनेला आशीर्वाद दिला.

त्या रात्री सारी आईच्या अंथरूणाभोवती होती. सर्वांकडे प्रेमाने शेवटचे पाहून म्हातारीने राम म्हटला! मालती रडू लागली. सर्वांचेच डोळे गळत होते.

काही दिवस गेले. वैनी मुलांना घेऊन माहेरी गेली होती. घरात तिघे भावंडे होती. मालती सारे करी.

“सखाराम, तू वकिलीचा तरी अभ्यास कर. काही तरी उद्योग करीत जा. नाही तर पुन्हा जीवनाचा कंटाळा येऊन तू निघून जायचास. मिळवता हो. संसाराला तुझीही थोडी मदत होऊ दे.” एके दिवशी दादा म्हणाला.

“मी तोच विचार करीत आहे. हायकोर्ट प्लीडरच्या परीक्षेस बसावे म्हणतो. मी पैसा मिळवीत नाही. दादा तुमच्यावर सर्वांचाच भार.”

“मी भार उचलीतच आहे. मिळत आहे तोवर सर्वांना मी पोशीनच, परंतु तू तुझ्या जीवनाच्या दृष्टीनेही विचार करायला हवा ना?”

“होय, दादा.”

सखाराम वकिलीचा अभ्यास करू लागला. आणि मालती घरात शिवणकाम करू लागली. हातशिवणाचे यंत्र तिला दादाने नुकतेच घेऊन दिले होते. तीही घरखर्चाला मदत करू लागली.

एके दिवशी घनाचे पत्र आले. सखाराम किती तरी वेळ ते पत्र वाचीत होता. पत्र खाली ठेवून तो गंभीरपणे बसला.

“भाऊ, कुणाचे पत्र?” मालतीने विचारले.

“त्या माझ्या मित्राचे.”

“घनाचे; होय ना?”

« PreviousChapter ListNext »