Bookstruck

घनाचा आजार ! 17

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“माझ्या लक्षातच नाही आले. मला वाटले की तुमचे लग्न झाले. मागे कोणी बॅरिस्टर आला होता ना?” घनाने प्रश्न केला.

“तो बॅरिस्टर नव्हता,- बालिशतर होता; बावळट होता त्याचा मला तिटकारा वाटला.” सखारामने सांगितले.

रस्त्यात घनाला जोराने ठेच लागली. आंगठ्यातून रक्त आले.

“बरेच लागले.” मालती म्हणाली.

“माझे लक्षच नव्हते.” घना म्हणाला.

“जपून जावे लागते जगात.” सखाराम म्हणाला.

तिघे घरी आली. दादाही घरी आला होता. मालती स्वयंपाक करायला गेली. गच्चीत आरामखुर्ची टाकून तिच्यात घना पडला. त्याच क्षणात डोळा लागला. दोघे भाऊ बोलत होते, मालतीच्या लग्नासंबंधी बोलणे होते.

“हे तुझे मित्र नाही का करणार लग्न?” दादाने विचारले.

“दादा, एकदम तुझ्या मनात कसे आले?”

“त्यांना पाहून मला पवित्र, पावन वाटले. असा नवरा मालतीला मिळाला तर तिच्या गुणांचे चीज होईल, असे एकदम मनात आले.”

“मी कसे त्याला विचारू? सुंदरपूरला तो सेवा करतो. कामगार संघटना करीत आहे. रस्ते झाडतो, शिकवतो. त्याला का मी संसारात गुरफटवू? आणि संसाराला नको काय? त्याच्याजवळ काय आहे? सुंदरपूरचे काही मित्र वर्गणी करून त्याचा खर्च भागवतात.” सखारामने सांगितले.

“माझ्या आपले मनात आले.” दादा म्हणाला.

“काय आले, दादा, मनात?” मालतीने विचारले.

“दुसरे काय असायचे मनात? तुझ्या लग्नाचे हो. आईच्या आत्म्याला एरवी समाधान मिळणार नाही.” दादा दु:खाने म्हणाला.

“दादा, मी तुम्हांला आज सांगून टाकते की माझ्या लग्नाचा विचार तुम्ही मनातून काढून टाका. ती चिंता अत:पर नको.”

“का? तू का कोणाला पसंत केले आहेस? आशी लाजू नको.”

“दादा, मी कोठे जाते का तरी? मी कोणाला पसंत करू? दरिद्री-नारायणाच्या सेवेत रमावे असे मला वाटते. आज ना उद्या तुझी मालती सेवेसाठी बाहेर पडेल.”

« PreviousChapter ListNext »