Bookstruck

संपाची तयारी 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२६ सप्टेंबर आला; आणि उजाडत मुले आली, मुली आल्या. घनाने त्यांचे स्वागत केले. सामान घेऊन ती स्वच्छता तुकडी निघाली. शहराची सात दिवसांत वाटणी करण्यात आली. होती. आज सारा बाहेरपुरा स्वच्छ करायची होता. घनाने आपल्या हातात पत्र्याचे तुकडे घेतले होते. जेथे जेथे विष्ठा दिसे, तेथे तो जाई; वर माती टाकी नि खरवडून भरून घेई. मुलांमुलींनीही ती विद्या आत्मसात केली. सारे स्वच्छ होऊ लागले. घाण दिसताच मुलांना स्फूर्ती येई. ‘अरे ही बघ इकडे घाण. ही बघ-!” असे म्हणून त्या घाणीवर ती तुटून पडत. जणू शत्रूवर तुटून पडत आहोत असे त्यांना वाटे. आणि हेच आपले खरे शत्रू नव्हेत का? अज्ञान, अस्वच्छता, आळस, रूढी, नाना भेद, हेच आपले शत्रू आहेत. यांना दूर केल्याशिवाय कोठले स्वराज्य? यांना दूर न करता स्वराज्य आले तरी ते टिकणार नाही.

स्वच्छ करू स्वच्छ करू।
हा गाव आपुला स्वच्छ करू।।
निर्मळ करू या अपुला गाव।
दुर्गंधीला नुरवू ठाव।
स्वच्छ असे अपुला देव।
नवोपासना सुरू करू।।

अशी गाणी गात ते झाडू मारीत होते. कचरा भरीत होते. ते सारे मस्त झाले होते. सेवेचा एक थोर आनंद असतो. त्याची चटक लागली म्हणजे मग सुटत नाही.

“पुरे आता. आजचे काम संपले. नदीवर आंघोळीला येता का? गंमत होईल.” घनाने विचारले.

“नदीवरच जाऊ.” एकजण म्हणाला.

“परंतु कपडे कोठे आहेत बरोबर!” दुसरा म्हणाला.

“आपण नदीवर जाऊन हातपाय धुऊन येऊ. ही सारी स्वच्छतेची हत्यारे साफ करू.” घनाने सुचवले.

सारी मंडळी नदीवर गेली. ती आपोदेवता तेथे खळखळ वाहात होती. सकल धाण वाहून नेणारी ती लोकमाता या मुलांना बघून जणू गाणी गात उचंबळून त्यांचे स्वागत करीत होती.

« PreviousChapter ListNext »