Bookstruck

अपेक्षा 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तुम्ही फार छान बोलता.”

“तुमचे सर्टिफिकेट नको आहे.”

“घनश्याम, संप पुकारलात तर पकडले जाल. याद राखा.”

“सरकार का केवळ तुमचे आहे?”

“मग कोणाचे आहे?”

“गरिबांचे नाही?”

“शब्दाला गरिबांचे परंतु सूत्रधार आम्ही आहोत. आणि पैशाने कोणाला विकत घेता येत नाही? सारे अधिकारी आमच्या हातातील. उद्या तुम्हांला मी येथून हद्दपार करू शकतो.”

“ठीक. हीच तुमची संस्कृती ना? तुमच्याच तोंडून तुमची लीला कळली हे बरे झाले! तुमच्याबद्दल थोडाफार आदर वाटे, तोही गेला.”

“तुमच्या आदराची आम्हांला जरुरी नाही. जोपर्यंत इंग्रजी, मराठी, गुजराती, हिंदी वृत्तपत्रे आमचे पवाडे गात आहेत, तोवर आम्हांला कशाची भिती? संपादकाचे कान ओढून आम्ही लिहायला लावतो. भरपूर पगार देतो. परंतु त्यांची स्वतंत्र बुद्धी मारतो. भीष्माचार्यांसारखे अर्थाचे दास झाले तेथे प्रचार सुरू करवतो. तुम्हांला ते माय धरणी ठाय होईल. काय समजलात तुम्ही?”

“समजलो,-- की तुम्ही एक द्रव्यान्ध मनुष्य आहात.”

“बस् करा.”

“अच्छा, नमस्ते.”

“या सुंदरपूरातून तुम्हांला घलवीन तरच नावाचा सुंदरदास!”

“ईश्वराची पृथ्वी विपुल आहे. आणि मरताना सर्वांना साडेतीन हातच पुरत असते. बरोबर अधिक नेता येत नसते.”

घना तेथून निघून गेला. आता तेथे शान्तता होती.

“पाणी आणू?” व्यवस्थापकांनी विचारले.

“द्या पेलाभर.” मालक म्हणाले.

थोडा वेळ गेल्यावर, पाणी पिऊन शांत झाल्यावर सुंदरदास व्यवस्थापकास म्हणाले : “हे पहा, फौजदार व मॅजिस्ट्रेट तुमच्या परिचयाचे आहेतच. त्यांना सारे सांगून ठेवा. पैशांकडे पाहायचे नाही. याचा काटा दूर करायचा.”

“ते माझे काम. मी त्यांच्या कानावर तसे घालून ठेवलेच आहे. ते म्हणाले, निर्धास्त असा. आपण विश्रांती घ्या. डोक्याला खूप त्रास झाला असेल.”

“मी जातो.”

« PreviousChapter ListNext »