Bookstruck

इंदूरकडे प्रस्थान 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रामदास महत्त्वाचे सारे घेऊन गेला. घना तेथे तयारीने बसला. त्याने गीताई खिशात घातली. टकळीवर तो तेथे सूत काढीत बसला. थोड्या वेळाने पोलिस व त्यांचे अधिकारी आले.

“या. आपली कालपासून वाट पहात होतो.” घना म्हणाला.

“आम्हांला शेवटपर्यंत वाटत होते की तुम्ही संप टाळाल.”

“संप टाळणे मालकांच्या हाती,--कामगारांच्या हाती नाही. आजपर्यंत बेटे लुबाडीत आले, त्यांना तुम्ही तुरुंग नाही दाखवणार! ख-या अर्थाने ते चोर आहेत.”

“परंतु आम्हांला कायद्याच्या अर्थाने जावे लागते. तुमची तयारी आहे ना? कपडे वगैरे घ्या.”

“ही वळकटी बांधलेली आहे.”

खोलीत महात्माजींची तसबीर होती. त्याने तिला प्रणाम केला व तो निघाला.

“खोलीला कुलूप लावणार का?”

“नको. आता मित्र येतील.”

इतक्यात रामदास आलाच.

“अच्छा, रामदास. शांतीने संप चालवा. चला.” तो म्हणाला.

“तुमच्या शिकवणीप्रमाणे आम्ही जाऊ.”

पोलिसांच्या पहा-यात घनश्याम गेला.

तालुका लॉकपमध्ये एका खोलीत त्याला ठेवण्यात आले.

त्याची झडती घेण्यात आली.

लॉकपच्या दाराला कुलूप लावले.

घना खोलीत फे-या घालीत होता. शरीर बंदिस्त झाले, पण मन विश्वसंचार करीतच होते. मानवी मन कोठेही स्वतंत्र राहू शकते. या जगात ख-या अर्थाने मनाचे, सदसदविवेकबुद्धीचे हेच एक स्वातंत्र्य आहे. या विश्वात एक प्रकारे आपण परवशच आहोत. शस्त्रांची कितीही प्रगती झाली तरी क्षणात मुसळधार पाऊस पडतो, भूकंप होतात, ज्वालामुखी भडकतात, उष्णतेची लाट येते, कडाक्याची थंडी पडते. अशा या जगात एकच स्वतंत्रता आहे. मी माझ्या सदसदविकबुद्धीप्रमाणे चाललो, ही खरी स्वतंत्रता.

« PreviousChapter ListNext »