Bookstruck

इंदूरकडे प्रस्थान 9

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सखारामची चिठ्ठी देण्यात आली. विशेष काही तिच्यात नव्हते. परिस्थितीची कल्पना देण्यात आली होती. रामदासने सभेचा सारा वृत्तान्त निवेदला. त्या बांगड्यांची हकीगत त्याने सांगितली!

“ ‘तुमच्यात मला सेवा करायची आहे. हातांत सोन्याच्या बांगड्या घालून ती कशी करता येईल?’ असे मालतीबाई म्हणाल्या. काही कामगार बायका तेव्हा रडल्या. एकंदर परिणाम फार छान झाला. परंतु मालक फूट पाडू पाहात आहेत. कामगारांना पैशाने विकत घेऊ पाहात आहेत. बघावे काय होते ते. आता तर नुसता आरंभ आहे. सरकार लक्ष घालील असे वाटत नाही. युनियनचे तीन-तेरा वाजावे असेच सरकारचे व मालकाचे ठरलेले दिसत आहे!” रामदास म्हणाला.

“इंदूरहून बाबू आला का?”   

“नाही आला.”

“तुमच्या खटल्याचे काय?”

“हा मॅजिस्ट्रेट म्हणे बदलत आहे, आता दुसरा येईल तेव्हाच खटला सुरू होईल.”

रामदास निघून गेला. घना खोलीत शतपावली करीत होता. करंडीतील बोरे त्याने खाल्ली. मनात अनेक विचार चालले होते. संपाचे विचार होतेच; परंतु मधून मालतीचीही मूर्ती त्याच्या डोळ्यांसमोर येई. इतक्यात त्याच्या मनात एक कल्पना आली. करंडीत चिठ्ठी वगैरे तर नसेल ना? त्याने करंडीतील सारी फळे काढली. परंतु चिठ्ठी नव्हती! त्याला लाज वाटली. अशी चोरून चिठ्ठी सखारामची बहीण देणार तरी कशी? आपणच चुकलो. मनुष्य स्वार्थी होताच निराळ्या दृष्टीने विचार करू लागतो. त्याचा ध्येयवाद थोडा तरी खाली येतो.

तो चटईवर पडला. त्याचा डोळा लागला.

तिसरे प्रहरी सखाराम व मालती भेटायला आली होती.

“हा हार तुमच्या गळ्यात घालते. मान करा पुढे.” ती म्हणाली.

« PreviousChapter ListNext »