Bookstruck

सीमोल्लंघन 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तेथे स्वातंत्र्याचा झेंडा फडकत आहे. ती शाळा. तो दवाखाना. ते क्रीडांगण. तो म्युझियम. ती सभेची जागा. ते पाहा एका बाजूला उद्योगधंदे, आणि ती पाहा सार्वजिक बाग. सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एका आकाशाखाली स्वेच्छेने प्रभूची प्रार्थना करीत आहेत!, करा, -- विचार करा. तेथे आपण कोठवर टिकाव धरणार? मजजवळ द्यायला काय आहे? प्रभूच्या कृपेने हे बक्षीस आले आहे. ते तुमच्या सेवेसाठी समर्पित आहे.”

आणखी आठ दिवस गेले. घना कामगारांच्या घरी हिंडे, तो स्वत: दूध वाटी. परंतु अत:पर कामगारांचा अंत पाहणे बरे नाही असे त्याला वाटले. एके दिवशी संप मागे घेण्यात आला! भुकेलेले कामगार पुन्हा कामावर जाऊ लागले. घना त्यांची सेवा करीत होता. त्याच्याविषयी त्यांना आदर होता. एका क्षणात बक्षीस मिळालेले पैसे त्यांच्यासाठी त्याने दिले. ना स्वार्थ, ना अहंकार!

घनाचा वसाहतीविषयक प्रचार सुरू होता. शेतकी-तज्ञ मधु व माधव हे दोन नवतरुण त्याला मिळाले. सखारामचे आशादायक पत्र आले होते. सुंदरपुरातील काही कामगार जायला तयार झाले. आसपासच्या गावांतीलही ज्यांना नीट घरदार नव्हते, शेतीभाती नव्हती, असे काही उत्साही लोक तयार झाले.

कोणी आपल्या घरच्या आईबापांना म्हणाले, “तिकडे नीट व्यवस्था लागली म्हणजे तुम्हांला नेऊ. तोवर तुम्ही येथेच रहा.”

नव-वसाहतवाल्यांची यादी होऊ लागली. स्त्रीपुरुष मिळून जवळ जवळ पाचशे माणसे निघाली. मुलेबाळे वेगळी. एक खास रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली.

सखारामने सारी व्यवस्था केली होती. तेथे सर्वांचा रसोडा होता. नदीचे पाणी आणण्यात आले होते. काही छोट्या झोपड्या होत्या. काही तात्पुरत्या बराकी होत्या. अमरनाथने अवजारे पाठवली होती. गायीगुरे विकत घेण्यात आली. तिथे जणू गोशाळा सुरू झाली. डोंगराच्या पायथ्याशी ती जमीन होती. डोगरावर जंगल होते. आसपास मोठमोठी झाडे होती. एक वटवृक्षाचे झाड तर केवढे होते! गायीगुरे त्याच्या छायेत बसत. दमलेभागलेले तेथे  झोपत. सखाराम व त्याचे मित्र यांनी तेथे आरंभ केला होता. घना व येणारे इतर साहसी जीव यांचे स्वागत करायला ते तयार होते.

« PreviousChapter ListNext »