Bookstruck

सीमोल्लंघन 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“जा कामाला. इकडे कशाला आलेत?” ती रागाने म्हणाली.

“ही जंगलातील फुले आणली आहेत.”   

“तुम्ही का जंगली आहात?”

“आणि तू का नाहीस?”

“मला तू म्हटलेत! फजिती झाली. किती छान आहेत फुले! तुम्हांला जंगली म्हटले म्हणून रागावलात? जंगलातच नाही का आपण राहात? जंगलात मंगल निर्मायचे. खरे ना?”

“तू दोन दिवस कामाला येऊ नको. आजारी पडणे पाप आहे!”

“तुम्ही जवळ असल्यावर का आजारी पडेन” अमृत जवळ असून का कोणी मरेल?”

“तू कवी झालीस की काय?”

“येथील सुंदर सृष्टी बघून कोण कवी होणार नाही?”

“आपणाला येथे धनधान्य निर्मितीचे काव्य फुलवायचे आहे.”

“सारी ओसाड जमीन लागवडीस आणा.”

“शक्ती अजमावून काम हाती घेऊ. मी जातो. मला भूक लागली आहे.” घना गेला. तिकडून सखाराम जेवून येत होता.

“अजून तरी ताप नाही.” तो म्हणाला.

“जा—जेव. तू आजारी पडू नको.” सखाराम म्हणाला.

दिवस जात होते. सारी जमीन नांगरून झाली. काही काही तात्पुरती पिके नदीच्या पाण्यावर करण्यात आली होती. भाजीपाला लावण्यात आला. फुलझाडेही फुलू लागली होती. सर्वांना अपार उत्साह वाटत होता.

आणि पावसाळा आला. जमीन भिजली. वाफसा होऊन पेरणी करण्यात आली. सर्वांना आनंद झाला. पिके वाढत होती. फुले फुलत होती. मुले खेळत होती. मोठी माणसे काम करीत होती. स्वर्गनिर्मिती होत होती.

घना, सखाराम व इतर सारे देशाचे काय होणार इकडेही लक्ष देत होते. वर्तमानपत्रे येत. चर्चा चालत. फाळणी होणार, हे ऐकून प्रथम सर्वांना वाईट वाटले. परंतु घनाने सा-या गोष्टी नाट समजावून दिल्या.

« PreviousChapter ListNext »