Bookstruck

56 शरण जाणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


प्रत्येक धर्मामध्ये पंथांमध्ये शरण जाणे ही कल्पना आहे .बाबा सांगतात मला  शरण या. धर्मगुरू सांगतात त्याला शरण जा.मग तो अल्ला बुद्ध  ख्रिस्त राम विठ्ठल किंवा आणखी कुणी असो .जात पंथ इत्यादींचे प्रमुख, आम्ही सांगतो तेच खरे अंतिम असा आग्रह धरतात .जात पंथ इत्यादी जो काही विचार करावयाचा तो आम्ही व आमच्या पूर्वसुरींनी  केलेला आहे .तुम्ही फक्त आचरण करा तुमचे कल्याण होईल असे सांगतात .थोडक्यात का व कसे असे प्रश्न न विचारता जी काही चौकट पूर्वसुरींनी निश्चित केलेली आहे त्याप्रमाणे आचरण करा असे सांगतात.सर्व धर्मांमध्ये अंतिम सत्य श्रेष्ठ शक्ती ही कल्पना आहे .

संपूर्ण शरण जाण्यामुळे ते सत्य तुम्हाला प्राप्त होईल असा विश्वास दिला जातो .त्याचप्रमाणे अंतिम सत्य हे अनाम निराकार अनंत अवर्णनीय आहे असेही सांगितले जाते .एवढ्याच वर्णनावर न थांबता प्रत्येकजण त्याच्या त्याच्या  कल्पनेप्रमाणे त्याचे वर्णन करीत असतो .अशा प्रकारे धार्मिक ग्रंथांचा एक समुद्रच निर्माण झाला आहे असे म्हणता येईल . जे वर्णनातीत आहे त्याचे वर्णन कां बरे करतात ?ते मला समजलेले नाही .भाषा ही भावना व विचार यांचे संवहन करण्यासाठी निर्माण झाली . गणित भूगोल  भौतिक शास्त्रे यांच्यासाठी भाषा अर्थातच आवश्यक आहे .

वस्तुस्थितीचे वर्णन करण्यासाठी उदाहरणार्थ किती वाजले तो झोपी गेला आहे किंवा बाहेर गेला आहे यासाठी भाषा आवश्यक आहे .परंतु जेव्हा भावना कल्पना परमेश्वर इत्यादींच्या वर्णनासाठी भाषा वापरली जाते त्यावेळी त्या भाषेमुळे शब्द रचनेमुळे योग्य समज निर्माण होती का ?असा माझा प्रश्न आहे .एखाद्या भावनेला जेव्हा आपण चिठ्ठी लावतो म्हणजे ती शब्दातून व्यक्त करतो तेव्हां ती संपूर्णपणे सर्व छटांसह आपल्यापर्यंत पोचते का ?असा माझा   प्रश्न आहे.गीता सारख्या ग्रंथांवर जर लोकांनी केलेल्या अनेक टीका म्हणजेच  निरनिराळ्या लोकांनी लावलेले त्याचे अर्थ लक्षात घेतले तर  मी काय म्हणतो ते लक्षात येईल .एकाच ग्रंथांचे भक्तीपर कर्मपर योगपर ज्ञानपर असे अनेक अर्थ लावले गेले.एवढेच नव्हे तर भक्तीपर वगैरे अर्थ लावणाऱ्यांनीही निरनिराळ्या प्रकारची विविध ग्रंथसंपदा  निर्माण केली .एकाच शब्दाचे एकाच वाक्याचे एकाच लेखाचे प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार आकलनानुसार निरनिराळे अर्थ लावतो. कदाचित सांगणाऱ्याला या सर्वांपेक्षाही वेगळा अर्थ अभिप्रेत नसेलच असे नाही !भावनांना चिठ्ठी  लावलीच पाहिजे का चिठ्ठीशिवाय भावना आपल्याला कळू शकणार नाहीत का ?एखाद्या चाकोरीचे  एखाद्या विशिष्ट आचरणाचे पालन करून कदाचित आपल्याला काही काळ किंवा जन्मभर समाधान लाभेल

.पण सत्य प्रकट होईल का ?शरण जाण्याने तुम्ही ज्याची इच्छा केली ते कदाचित तुम्हाला मिळेलही पण ते सत्य असेल का ?मी काहीतरी आहे व मला आणखी  वेगळे काहीतरी बनावयाचे आहे या पेक्षा जे काही आहे त्याला तसेच सामोरे का जाऊ नये ?ज्या ज्या वेळी जी जी भावना असेल त्या त्या वेळी त्या त्या भावनेत आपण का राहू नये ? आपल्याला का बदलावयाचे असते ?शब्दीकरणा शिवाय त्या त्या भावनेत राहून आपल्याला ती भावना यथार्थतेने समजेल व त्यातूनच सत्य प्रगट होईल . जे आहे ते आहे .काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे विचारानेच  विचार नष्ट  होईल का ?साध्या सोप्या गोष्टी अापण विशेष कठीण करून ठेवल्या आहेत का ?
©प्रभाकर  पटवर्धन 
 

« PreviousChapter ListNext »