Bookstruck

११ चमत्कार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पेपरमध्ये किंवा टीव्हीवर बातम्यांमध्ये अधून मधून पुढील प्रकारच्या बातम्या येतात .कोणाच्या पोटातून केसांचा एक किलो वजनाचा गोळा काढला .कोणाच्या पोटातून ऑपरेशन करून खाल्लेली नुडल्स मोठ्या प्रमाणात बाहेर काढण्यात आली . कोणी चुका टाचण्या वगैरे खात होता . आणि  पोटात दुखायला लागल्यामुळे ऑपरेशन करून त्या बाहेर काढण्यात आल्या वगेरे वगेरे .अशा बातम्या वाचल्या नंतर त्या खऱ्याही वाटत नाहीत आणि खोट्याही म्हणता येत नाहीत .अश्या वेळी मला माझ्या बाबतीत घडलेली एक गोष्ट आठवते .

१९४३ साल होते .मी दहा वर्षांचा होतो त्यावेळची गोष्ट आहे .मी शिक्षणासाठी मामाकडे माझ्या आजोळी राहात होतो  .मामाकडे न्हाणीघर जेथे पाटाचे पाणी येते तिथे बांधलेले होते.वर फक्त छप्पर होते .बाकी चारी बाजू उघड्या होत्या .न्हाणी घरांमध्ये दोण(हा शब्द द्रोण या शब्दावरून आलेला असावा. एका मोठ्या दगडांमधून तासून  चौकोनी किंवा वर्तुळाकार बनवलेले दगडाचे पाणीसाठवण्याचे मोठे भांडे )थाळ (पाणी तापवण्यासाठी ज्यावर मोठे तपेले ठेवले जाते अशी चूल)पाथर (अंघोळीसाठी गुळगुळीत दगड ) वगैरे गोष्टी होत्या.स्वयंपाक घरापासून न्हाणीघर थोडे लांब होते.ऊन लागू नये उन्हाच्या झळा स्वयंपाकघरात येऊ नये म्हणून या दोहोंमध्ये एक मांडव घातलेला असे.हा मांडव उन्हाळ्या पुरता तात्पुरता असे .यावर झाप न घालता माडाच्या झावळ्या टाकलेल्या असत .झावळ्याची टोके अधून मधून खाली येत असत व आम्ही स्टुलावर चढून ती वरती गुंतवून ठे वीत असू .या मांडवामध्ये कडेला एक धक्का होता तिथे उभे राहून आम्ही तोंड धूत असू .

एके दिवशी सकाळीमी उठल्यानंतर तोंड धुण्यासाठी जात असताना झावळीची एक दोन टोके खाली आलेली दिसली . ही टोके वर खोचण्यासाठी मी स्टुलावर पटकन चढलो .झावळीचे एक टोक माझ्या डोळ्यात जोरात घुसले आणि माझा डोळा प्रचंड दुखू लागला.मी नाचून थयथयाट करीत होतो व डोळा जोरजोरात चोळीत होतो आणि जोर जोरात ओरडत होतो.माझा मामा अरे ओरडू नको काय झाले म्हणून विचारीत होता.डोळा चोळू नको म्हणूनही सांगत होता .एवढ्यात चमत्कार झाल्यासारखा माझा डोळा दुखण्याचा थांबला .फक्त किंचित वेदना होत होती  .नंतर तीही थांबली .मी काय झाले ते सांगितले . नंतर सर्वजण ती घटना विसरून गेले.आम्हाला झावळीचे टोक डोळ्याला बहुधा घासून गेले असे वाटले .मध्ये सुमारे पंधरा दिवस गेले . एवढ्या काळात स्वाभाविकपणे मी अनेकदा तोंड धुतले, डोळ्यांवर पाणी मारले, पोहण्यासाठी गेलो,अंघोळ केली डोळे चोऴले असावेत,डोळ्यांमध्ये काही असल्याची काहीही जाणीव झाली नाही .एके दिवशी सकाळी उठल्यावर तोंड धुताना तोंडावर पाण्याचा हबका नेहमीप्रमाणे जोरात  मारला .आणि पंधरा दिवसांपूर्वी पेक्षाही जास्त जोरात डोळ्यातून कळ आली.माझा थयथयाट व जोरात ओरडणे चालूच होते .मामांने माझी पापणी वर करून त्यातून जवळजवळ एक इंच लांबीचा हिरकुटाचा किंचित कुसलेला तुकडा बाहेर काढला .माझा डोळा लगेच दुखण्याचा थांबला .

प्रथम तोंडावर पाणी मारले त्यातून हा तुकडा गेला असावा की काय असा संशय आला परंतु ती शक्यता वाटली नाही आणि मग पंधरा दिवसांपूर्वीची ती घटना आठवली .त्या वेळी डोळ्यांमध्ये पापणीत  हिरकुटाचा तुकडा घुसून तो तुटला .जरा डोळा चोळल्यावर तो पापणीमध्ये तसाच राहिला .पंधरा दिवस तो तिथे आहे याची पुसटशीही कल्पना आली नाही आणि त्या सकाळी पाणी मारल्याबरोबर तो चाळवला गेला आणि टोचू लागला .

डोळ्यांमध्ये लहानसा कण असला तरीही तो आपल्याला स्वस्थ बसू देत नाही असे असताना हा एवढा मोठा तुकडा पंधरा दिवस डोळ्यांमध्ये स्वस्थ होता आणि मी ही स्वस्थ होतो हा  एक चमत्कारच .

या स्वतःच्या अनुभवामुळे मी जेव्हा सुरुवातीला उल्लेख केलेल्या घटना वाचतो तेव्हा त्या असू शकतील असे मला वाटते आपले शरीर हे एक आश्चर्यच आहे .

१/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com

« PreviousChapter ListNext »