Bookstruck

पत्री 53

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मी तुम्हाला काय देउ परतून
मी काय देउ हो खूण
मी जगताच्या पासुन घेतो भारी
परि अजुनी रडत भिकारी
मज घालाया येईना हो भर ती
म्हणुनी हे लोचन रडती
मज किती मरावे वाटे
ते भवत्प्रेम मज काटे
मति दाटे अंतर फाटे
हा पोळितसे विचार माझ्या हृदया
म्हणुनि ना प्रेम द्या न दया।।

मजपासोनी अपेक्षा तुम्हां असती
प्रेमाची म्हणुनी वृष्टि
हा उपयोगा येइल तुम्हां वाटे
प्रेमाचे म्हणुनी नाते
मज निर्लोभी पवित्र पावन गणुनी
देतसा प्रेम आणोनी
परि तुम्हां सांगतो सत्य
करु नका अपेक्षा व्यर्थ
मी हताश दुर्बळ पतित
हा उपयोगी नाही, येइल दिसुनी
मग जाल सकलही फसुनी।।

ते पुत्राला मायबाप वाढविती
करितात किती ते प्रीती
मनि आशा की होइल मोठा पुत्र
वार्धक्यी देइल हात
हा येइल की पुत्र आमुच्या कामा
मनि इच्छुन देती प्रेमा
जरि उनाड मुलगा झाला
किति दु:ख आईबापाला
केवढा ढका आशेला
त्या हृदयीच्या खेळविलेल्या आशा
जातात सर्वही नाशा।।

तुम्हि काहिच का अपेक्षा न ठेवून
देतसा प्रेम आणून
तुम्हि काहिच का आशा ना राखून
देतसा प्रेम वाढून
मजवरि तुमचे प्रेम सदा जे दिसते
निरपेक्ष काय ते असते
प्रेमास न का फलवास
प्रेमा न कसलि का आस
जे देत असा तुम्हि द्यास
ते निरपेक्ष प्रेम असे जरि जवळ
मज त्याचा द्यावा कवळ।।

मज गंध नसे रंग नसे ना शुभ्रता
पावित्र्य नसे ना मधता
मी दुर्गंधे भरलेले हे फूल
ते विषमय फळ लागेल
या सगळ्याला असाल जरि का सिद्ध
तरि करा प्रीतिने बद्ध
होवो न निराशा तुमची
मागून थोर हृदयाची
म्हणुन ही कथा मम साची
मी सांगतसे तुमच्या चरणांपाशी
आणून अश्रू नयनांसी।।

जो पाप्याला हृदयापाशी धरिल
प्रेमाने त्या न्हाणील
ज्यापासोनी इवलिहि नाही आस
जो त्यासहि दे प्रेमास
ते प्रेम असे दुर्मिळ दुर्मिळ जगती
या भुवनि नसे तत्पाप्ति
प्रेमाच्या पाठीमागे
आशांचे असती लागे
ते प्रेम हेतुने जागे
मग रडती की प्रेम व्यर्थची केले
ते सारे मातित गेले।।

कधि केलेले प्रेम न जाई व्यर्थ
ज्याला ही श्रद्धा सत्य
तो पडलेला पर्जन्याचा थेंब
कधि तरि वरि आणिल कोंब
तो टाकीचा पडलेला जो घाव
दगडास करीलचि देव
ही आशा जरि हो अमरा
ते प्रेम तरिच तुम्हि वितरा
ना सोडा कधिही धीरा
मम जीवन हे फुलेल शतजन्मांनी
हे ठेवुनि मनि द्या पाणी।।

-पुणे, जानेवारी १९३५

« PreviousChapter ListNext »