Bookstruck

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महात्मा गांधी रोड व शिवाजी रोड यांना जोडणारी एक संभाजी रोड नावाची गल्ली आहे.गल्ली कसली चांगला मोठा रस्ता आता झाला आहे.वाहन, वाहनतळावर लावून मी कामानिमित्त गावात जात होतो.त्या गल्लीतून जात असताना मला अरे कम्या इकडे ये म्हणून कुणीतरी मोठ्याने हांक मारली.पाहतो तो पम्या मला दुकानातून हांक मारीत होता.या संभाजी गल्लीत,आता संभाजी रोडवर इलेक्ट्रॉनिक्सची सर्व दुकाने आहेत. आम्ही मित्र एकमेकांना कमलाकर पद्माकर सुधाकर अशा हांका न मारता,अशा पध्दतीने न संबोधता,कम्या पम्या सुध्या अशा हांका मारतो असेच संबोधतो.त्या पध्दतीनुसार त्याने मला कम्या म्हणून हांक मारली.त्याने मोठ्याने हाक मारल्यामुळे रस्त्यावरील दोनचार पांथस्थ माझ्याकडे बघू लागले.  

पद्माकरचे संभाजी रोडवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भव्य दालन आहे."पिन टू पियानो" या म्हणीप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्समधील सर्व वस्तू त्याच्या दुकानात, चुकलो भव्य दालनात  मिळतात.मला लागणार्‍या  इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित सर्व वस्तू मी त्याच्याकडेच खरेदी करतो.तो मला योग्य सल्ला देतो.कोणती वस्तू खरेदी करावी किंवा न करावी याबद्दल त्याचा सल्ला उपयुक्त असतो .कंपनी,ब्रँड, मॉडेल,इत्यादी गोष्टी मी त्याच्यावर सोपवतो.कधीही जा त्याच्या दुकानात गर्दी असते.दुकान निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूनी खचाखच भरलेले असते.त्यातच खरेदीदारांची आणि केवळ उत्सुकतेने पाहणाऱ्यांची गर्दी असते.आज चौकशी करणारे, उत्सुकतेने पाहणारे, विंडो शॉपिंग करणारे, उद्याचे ग्राहक असतात.तो स्वतः व त्याचे नोकर यांची लगबग चाललेली असते.मला एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास मी त्याला  तसे फोनवर सांगतो.तो बहुधा उशीरा रात्री गर्दी नसलेल्या वेळी मला यायला सांगतो.त्यावेळी मी व सौ. जाऊन वस्तू पाहून, त्याचे वर्णन ऐकून, पम्याचा सल्ला घेऊन खरेदी करतो.

कामासाठी लगबगीने मी   संभाजी रोडने जात असताना त्याने मला हांक मारली.दुकानात सर्वत्र शांतता होती.गर्दीने ओसंडून वाहणारे दुकान जवळजवळ रिकामे होते.कधी नव्हे ते दुकान रिकामे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला.लोकांजवळ क्रयशक्ती नाही की लोकांना पद्माकरच्या दुकांनात खरेदी करावे असे वाटत नाही.आज असे काय झाले आहे की सर्व जण मालक व नोकर माशा मारीत आहेत.मला कांहीच कळत नव्हते.

मी त्याच्या दुकानात जावून त्याच्या खुर्ची शेजारी स्थानापन्न झालो.तिथून समोरची दोन तीन दुकाने स्पष्ट दिसत होती.पूर्वी जेव्हां जेव्हां मी गेलो तेव्हां तेव्हां गर्दीमुळे बाहेरचे कांहीच दिसत नसे.आज कुठेच गर्दी नव्हती.प्रत्येक दुकानात दोन चार डोकी दिसत होती.गर्दी नसल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले.नेहमी गर्दीने ओसंडून वहात असणार्‍या दुकानात ग्राहकांची दोन चार डोकी दिसत होती.मला तेवढ्यात पितृपंधरवड्याची आठवण झाली.आणि शुकशुकाट कां आहे त्याचा उलगडा झाला.  

मी त्याला हे काय रे? म्हणून विचारले.त्यावर त्याने हताश स्वरात पितृपंधरवडा पितृपक्ष असे सांगितले.लोक गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात त्यांना जी खरेदी करायची असेल ती करतात. किंवा अपेक्षित खरेदी पैसे जवळ असले तरी वस्तू स्वस्त मिळत असली तरी पितृ पंधरवड्यामध्ये न करता अश्विन महिन्यावर ढकलतात.  माहीत असूनही लोकांची अशी प्रवृत्ती कां असते? मी त्याला विचारले.त्यावर त्याने या महिन्यात खरेदी करणे अशुभ समजले जाते असे सांगितले.मी त्याला कां असे विचारता तो पुढीलप्रमाणे मला अगोदरपासून माहीत असलेल्या गोष्टीच सांगू लागला.

« PreviousChapter ListNext »