Bookstruck

०२ अस्मानी संकट २-२

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

(ही कथा काल्पनिक आहे. वास्तवाशी  कुठलेही  साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

त्याला स्वप्नात नंदादेवी शिखर व रूपकुंड सरोवर दिसले तसेच ते प्रत्यक्षात आहे का हे पाहण्यासाठी त्याने  संशोधनाला सुरुवात केली .खरोखरच तसे सरोवर आहे असे त्याला आढळून आले .आपल्याला असे स्वप्न का पडते आणि स्वप्नातील नंदादेवी शिखर व रुपकुंड सरोवर प्रत्यक्षात अगदी बरोबर तसेच कसे काय आहे हे त्याच्या लक्षात येईना .

त्याने आपल्या घराण्याचा इतिहास पहायला सुरुवात केली.त्याला निश्चित काहीच सापडत नव्हते .एक धागा त्याला सापडला .केव्हा तरी सहज बोलताना त्याचे वडील म्हणाले होते की त्यांचे काही पूर्वज हिमालयात देवदर्शनाला गेले होते.ते परत आले नाहीत.ते केव्हा गेले होते व कुठे गेले होते ती माहिती मिळत नव्हती . याहून जास्त काहीच माहिती सापडत नव्हती . 

हेमंतने वडिलांना फोन लावला .त्यांना आपल्या स्वप्नाबद्दल सर्व हकीकत सांगितली .त्यांना आपले पूर्वज कुठे गेले होते त्याबद्दल काही जास्त माहिती आहे का ते विचारले .त्यांना काहीही माहिती नव्हती.

त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला तेच स्वप्न पुन्हा पडले .यावेळी स्वप्नात थोडी प्रगती झाली होती .रूपकुंड सरोवराच्या आसपास व सरोवरातही हाडे व कवट्या पडलेल्या होत्या .ती हाडे व कवट्या पाहात असतानाच पुन्हा आकाश काळवंडून आले .पर्जन्यवृष्टी होऊ लागली.व लगेचच  मोठ्या गारांची भयानक वृष्टी सुरू झाली.आणि तो घामाघूम होऊन दचकून जागा झाला .

त्याने नेटवर शोधून पुन्हा एकदा खात्री करून घेतली . त्याला खरोखरच तिथे सरोवर आहे असे आढळून आले .नंदादेवी शिखराला परिक्रमा करणे पुण्यप्रद समजले जाते हेही त्याला समजले. पाहिलेली हाडे व कवट्या यांचा आपल्याशी काय संबंध असावा ते त्याच्या लक्षात येईना .आपल्याला ही माहिती कोण देईल तेही त्याला समजेना.

योगायोगाने त्याच्या मित्राने एका स्वामींची  माहिती सांगितली .त्यांना अंतर्ज्ञानाने बऱ्याच गोष्टी कळतात असे त्याच्या मित्राचे म्हणणे होते .हेमंतचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता .मित्राने फारच आग्रह केल्यावरून तो  त्यांच्याकडे जाण्याला तयार झाला.तो मित्रच त्याला त्यांच्याकडे घेऊन गेला .

स्वामींना पाहताच हेमंतचा त्यांच्यावर कसा कोण जाणे विश्वास बसला .कृश शरीरयष्टी, गौरवर्ण, हळू आवाजात बोलणे,आश्वासक स्मित,खोल आत काहीतरी सतत पाहात असल्यासारखे डोळे ,हे सर्व हेमंतवर खोलवर छाप पाडून गेले.त्याने मनापासून वाकून त्यांच्या पायांना स्पर्श करून प्रणाम केला.

*हेमंतने बोलता बोलता त्यांना आपली समस्या व स्वप्न सांगितले .*

स्वामींची एक पद्धत होती .ते स्वतः फारसे बोलत नसत .दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीने एखादा प्रश्न विचारल्यास ते त्यांच्या संग्रहात असलेल्या असंख्य पुस्तकांपैकी एखादे पुस्तक सहज उघडीत चाळीत आणि त्यातील काही पाने वाचण्यासाठी देत.त्यांनी दिलेला मजकूर वाचल्यावर आलेल्या व्यक्तीचे समाधान होत असे.

आताही त्यांनी एक पुस्तक उघडून त्यातील काही पाने त्याला वाचायला दिली .ती वाचताना त्याला नंदादेवी शिखर, त्याचे धार्मिक महत्त्व,  त्याची परिक्रमा,त्रिशूळ पर्वताच्या पायथ्याशी असलेले रूपकुंड सरोवर याची माहिती मिळाली .

आपल्याला स्वप्न पडते त्याप्रमाणेच सर्व परिस्थिती त्याला त्या पुस्तकात लिहिलेली आढळून आली.त्याच्या नेटवरील व इतर संशोधनातही तशीच परिस्थिती आढळून आली होती. फक्त कवट्या व हाडे विखुरलेली आहेत असा कुठे उल्लेख त्याला आढळला नाही. त्याला स्वामींच्या अफाट वाचनाची व अफाट स्मरणशक्तीची झलक मिळाली .

त्यानंतर स्वामी थोडावेळ ध्यानस्थ बसले .त्यांनी नंतर डोळे उघडल्यावर हेमंतला पुढीलप्रमाणे सांगितले .

अनेक पिढ्यांपूर्वी चारशे पाचशे वर्षांपूर्वी तुझे पूर्वज त्या यात्रेला गेले होते.अकस्मात गारांचा वर्षाव सुरू झाला . आसपास कुठेही त्यापासून संरक्षण मिळण्यासारखी परिस्थिती नव्हती. मोठ्या गारा डोक्यावर आपटून कवटी फुटल्यामुळे तुझे पूर्वज व बरोबर असलेले वाटाडे  व हमाल हे मृत्यू पावले .या त्यांच्या कवट्या व हाडे आहेत.त्या आत्म्यांना त्यांच्या वंशजाने विधीपूर्वक तर्पण केल्याशिवाय सद्गती मिळणार नाही.तू त्यांचा वंशज आहेस .तूच त्यांना सद्गती देऊ शकतोस. तुला तिथे गेले पाहिजे. त्यांचे विधीपूर्वक तर्पण केले पाहिजे.तुला वारंवार पडलेले स्वप्न तेच सूचित करीत आहे.तू व तुझी पत्नी उत्तम गिर्यारोहक आहात .तुम्ही सर्व काही जुळवून आणून ते करू शकता .इतके बोलून स्वामी बोलण्याचे थांबले व पुन्हा ध्यानस्थ झाले .

हेमंत व त्याचा मित्र परत आले.हेमंतने हे सर्व त्याच्या पत्नीला नंदिनीला सांगितले .दोघेही पट्टीचे गिर्यारोहक असल्यामुळे त्यांनी सहा महिन्यांमध्ये सर्व जुळवाजुळव केली .मे अखेरीला त्यांनी  हिमालयात जावून नंदादेवी शिखराकडे प्रयाण केले.गारांचा वर्षाव झाल्यास त्याच्यापासून संरक्षणासाठी त्यांनी योग्य व्यवस्था बरोबर घेतली होती .जून अखेरीला मजल दरमजल करीत शेर्पांसह सर्व मंडळी रूपकुंड सरोवराजवळ पोहोचली.

*त्यांना तिथे कवट्या व हाडे विखुरलेली आढळली .

*ती सर्व गोळा करुन हेमंतने विधीपूर्वक त्यांचे तर्पण केले .

*तर्पणाचा विधी त्याने त्यासाठी शिकून घेतला होता.

*सर्व कवड्या व हाडे खाली आणून त्यांना अग्नी देणे शक्य नव्हते.

* त्याने जोखीम पत्करून बरोबर तीन पेट्रोलचे कॅन घेतले होते .

*सर्व अस्थींवर पेट्रोल शिंपडून त्याने अस्थीना अग्नि दिला .

*नंतर पूर्वजांची अपुरी राहिलेली नंदादेवी परिक्रमा पूर्ण केली .*

*नंतर हेमंतला तसे स्वप्न पुन्हा कधीही पडले नाही .* 

(काही संशयात्म्याना अश्या कथा  अंधश्रद्धा पसरवतात असे वाटेल.आपल्याला अज्ञात अश्या अनेक गोष्टी जगात आहेत एवढे आपल्याला कळले तरी पुरे)

(समाप्त)

३/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन

« PreviousChapter ListNext »