Bookstruck

प्रेमाची सृष्टी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“या घाणेरडया रुमालावर कशाला ही वेल, ही पाखरे?”

“हा रूमाल का घाणेरडा? हा रुमाल माझ्या जीवनात अमर होणार आहे. हा रुमाल सौंदर्यसिंधू आहे. हा रमणीय आहे, गोड आहे, हृदयंगम आहे. या रुमालाला नको नटवू तर कशाला? त्याला नको सजवू, त्याला नको फुलवू, त्याला नको पुजू, तर कोणाला?”

“सरले !”

“काय रे उदय? तुला माझी आठवण येत होती? तू दोनतीनदा येऊन गेलास. मी येथे न दिसल्यामुळे का निराश होऊन गेलास? का केवळ माझा रुमाल देण्यासाठी येत असस? आणि हा रुमाल धुतलास वाटते? त्याला वास रे कसला?”

“मला विणता, भरता थोडेच येते? आमचे ओबडधोबड हात !”

“परंतु ते प्रेमळ आहेत. ते जखम बांधतात. हळूच डोके धरतात. खरे ना? तू का याला अत्तर लावले आहेस? तू श्रीमंत आहेस?

“मी गरीब आहे.”

“खरेच? तरीच तुझे हृदय श्रीमंत. देव कोठली तरी संपत्ती देत असतो. कोणाला चांदीसोन्याची, माणिकमोत्यांची संपत्ती देतो. कोणाला कोमल भावनांची दौलत देतो. उदय, तू खरेच का गरीब आहेस? तुझे वडील काय करतात?”

“माझे वडील देवाकडे आहेत.”

“तुझे वडील नाहीत?”

“मी त्यांना पाहिले नाही. आई म्हणते की, तुला जवळ घेऊन त्यांनी प्राण सोडला. मरायच्या आधी त्यांनी माझा पापा घेतला, मुका घेतला. आई म्हणते तुझ्यासारखेच त्यांचे डोळे होते.”

“उदय, खरेच तुझे डोळे कसे आहेत.”

“कसे आहेत?”

“ते मी काय सांगू? परंतु असे डोळे मी पाहिले नाहीत.”

“तू किती जणांचे डोळे पाहिलेस?”

“फार कोणाचे नाहीच पाहिले.”

« PreviousChapter ListNext »