Bookstruck

प्रेमाची सृष्टी 18

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“नाही. बरे वाटते. तू आता जा.”

“तू दूध घेतोस? हे बघ मी आणले आहे. घे थोडे. मी कढत करून देत्ये.”

तिने स्टोव्ह पेटविला. तिने त्याला कढत करून दूध दिले. तिने पाणी गरम करून ठेवले. आणि ती त्याच्याजवळ बसली. त्याचे पाय चेपीत बसली. मध्येच ती त्याचा हात आपल्या हातात घेई व आपल्या तोंडावरून फिरवी. कधी आपला हात त्याच्या कपाळावर ठेवी.

“कसा थंडगार आहे तुझा हात !” उदय म्हणाला.

“उदय, लौकर बरा हो.” ती म्हणाली.

बराच वेळ झाला. कोणी बोलत नव्हते. उदय पडून होता.


“सरले, तू आता नीज, तू काय बरे आंथरशील? माझ्या गादीखालची सतरंजी काढून घेतेस? तिच्यावर ही पासोडी घाल. उशाला पुस्तके घे. पांघरायला ही चादर घे. तू नीज. मला काही लागले तर उठवीन.”

“उदय, मला नाही झोप येत. अशी तुझ्याजवळ बसूनच राहीन. तुझ्याजवळ सारखे बसून राहावे असे वाटते. तुझ्यापासून जराही दूर असू नये असे वाटते. उदय, तुझ्या अंगावर असा हात ठेवावा व तुझ्यात मिळून जावे, नाहीसे व्हावे असे वाटते. तुझ्यापासून नाही रे मला दूर राहवत. तुझ्या अंगावर हात ठेवून अशीच बसेन. आलीच झोप तर अशीच जरा पडेन. ठेवीन असे डोके हो. तू नीज. स्वस्थपणे झोप. नि मी थोपटते हो.” आणि उदय पडून राहिला. ती गाणे म्हणत होती. त्याला झोप लागली. तिने खाली वाकून पाहिले. शांत झोप. तिने दिवा मालवला. आणि तिने तेथेच त्याच्या अंगावर डोके ठेवले. तशीच पडून राहिली. तिला झोप लागली.

उदय जागा झाला. त्याला खूप घाम आला होता.

“सरले, घाम पुसायला हवा.” तो म्हणाला.

सरला जागी झाली.

“मला झोप लागली होती. थांब पुसत्ये हो.”

ती उठली. तिने त्याचा घाम पुसला. तिने त्याला दुसरा सदरा घालायला दिला. त्याला नीट पांघरूण पुन्हा घातले.

« PreviousChapter ListNext »