Bookstruck

प्रेमाची सृष्टी 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

उदयच्या आईने त्याला दिवाळीत बोलावले होते. परंतु अभ्यास फार आहे. म्हणून येत नाही असे त्याने कळविले. सरलेनेच त्याला जाऊ दिले नाही.

“नको रे जाऊ. मी येथे एकटी. बाबा, आई सारी मला टाकून गेली. तूही का जाणार? माझ्या जीवनात नको का दिवाळी, नको का दिवा?” तिच्या या दु:खपूर्ण शब्दांनी तो राहिला.

आणि सरला दिवाळीचे करू लागली. तिला अपार उत्साह आला होता. आज तिने सडा घातला. सुंदर रांगोळी घातली. तिने पणत्या लावल्या. आजच रात्री उदय जेवायला येणार होता. तो आला. तिने दोन ताटे वाढली. रांगोळी काढली. आणि दोघे जेवायला बसली. प्रेमाने जेवत होती. आणि दोघांनी विडे खाल्ले.

“कसा रंगला आहे तुझा विडा.” ती म्हणाली.

“पूर्वी रंगत नसे.”

“पूर्वी तुझ्यावर कोणी प्रेम करायला नसे. आता मी आहे. खरे ना?”

आणि तिने फोनो लावला. मनोहर प्रेममय गाणी. आणि रात्री शेवटच्या सिनेमाला दोघे गेली. जवळजवळ बसली हातात हात घेऊन. आज प्रेमाची पौर्णिमा होती. प्रेमाची पूर्तता होती.

“पुरे आता. आपण घरी जाऊ.” ती म्हणाली.

“चल.” तो म्हणाला.
आणि सरलेच्या घरी दोघे आली. प्रेमाची पूर्णता झाली. सकाळी सरला लौकर उठली. बराच उशीर झाला तरी उदय उठला नाही.

“उदय, ऊठ राजा. दूध घेशील का चहा?” ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली.

“तू देशील ते.”

आज माझ्याबरोबर चहाच पी.”

“उदय उठला. त्याने आज चहा घेतला. तिने सुपारी दिली. दोघे माडीत बसली.

“सरले, जाऊ ना आता?”

“चार दिवस दिवाळसण होऊ दे. माझ्या आयुष्यातील पहिली दिवाळी. राहा येथेच. बाबांचे पत्र येईल. मग जा, मी एकटी आहे. मला सोबत नको का?”

“बाबा अकस्मात येतील.”

“येऊ दे. भीती सोडायलाच हवी.”

“नको सरले.”

« PreviousChapter ListNext »