Bookstruck

प्रेमाची सृष्टी 22

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“मी तुला अंतर देणार नाही.”

“परीक्षा एप्रिलमध्ये ना?”

“हो.”

“म्हणजे सहा-सात महिने होऊन जातील. परीक्षा होताच मला घेऊन जा. तोपर्यंत देव अब्रू राखो. परीक्षा होताच आपण कायदेशीर रीत्या पतिपत्नी होऊ. देवाच्या घरी आलोच आहोत. समाजातही होऊ. उदय आजच आपण विवाहबध्द  झालो तर?

मी तुझ्या खोलीत येऊन राहीन. आपण लहानसा संसार सुरू करू.”

“सरले, तुला का माझा विश्वास वाटत नाही? मी गरीब आहे. दोघांचा खर्च कसा करायचा? थोडे दिवस कळ सोस. तुझी अब्रू ती माझीही नाही का?”

“उदय, स्त्रियांचे कठीण असते.”

“परंतु माझ्यावर विश्वास आहे ना?”

“आहे. तुझ्याशिवाय कोण आहे मला? कोणी नाही, कोणी नाही.”

तिकडे रमाबाई बाळंत झाल्या. मुलगा झाला. मुलगा चार महिन्यांचा झाल्याशिवाय त्या इकडे येणार नव्हत्या. त्यांनी विश्वासरावांनाच तिकडे बोलाविले आणि ते गेले. पुन्हा सरला एकटी राहिली. एका अर्थी बरे होते. तिला आता उलटया होत. कधी अशक्तपणा वाटे. परंतु हळूहळू कमी झाले सारे.

उदयची परीक्षा संपत आली. आज शेवटचा दिवस होता. शेवटची प्रश्नोत्तरे लिहून खोलीत आला. तो आईकडचे पत्र आले होते. ते मामांच्या सहीचे पत्र होते.

“तुझी आई आजारी आहे. तुझी परीक्षा म्हणून तुला बोलावले नाही. मी येथे आलो आहे. उद्या तुझी परीक्षा संपेल. लगेच ये.” असा त्यात मजकूर होता. दिवाळीतही तो घरी गेला नव्हता. आई किती वाट पाहात असेल. गेले पाहिजे ताबडतोब असे त्याला वाटले. तो विचार करीत आहे तो सरला आली.

“का रे उदय, सचिंतसा? पेपर कसे गेले?”

“चांगले गेले आहेत.”

“तू पास होशीलच. आता मोकळा झालास, किती तरी दिवसांत आपण पोटभर बोललो नाही. तुझी परीक्षा म्हणून मी येत नसे. आता माझ्याकडे चल. चार दिवस राहा. बाबा येथे नाहीतच.”

“सरले, आई आजारी आहे. मामांचे पत्र आले आहे.”


« PreviousChapter ListNext »