Bookstruck

आई गेली 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“उदय तसा नाही. त्याच्याजवळ कोठे आहेत पैसे? तो चहा पीत नाही, दूध घेत नाही, सिगारेट ओढीत नाही. कोठून पाहील सिनेमा? गरीब आईचा तो मुलगा.”

“नली म्हणत होती खरी, की उदय चहासुध्दा पीत नाही म्हणून. आमच्या नलीला तुमच्या उदयचे भारी वेड.”

“ती आली का?”

“हो आली. यंदा तिची परीक्षा नव्हती. बंडू मात्र तिकडेच महाबळेश्वरला गेला आहे. तुम्हांला काही हवे का?”
“काही नको. भाऊ आला आहे. तो सारे करतो. उद्या माझे बरेवाईट झाले तर उदयला सांभाळा. त्याचे शिक्षण झालेच आहे. परंतु नापास झाला तर? त्याला थोडी मदत करा. तो आपण होऊन मागणार नाही. मोठा स्वाभिमानी. लहानपणी तुमच्याकडून कोट आणला होता, तो त्याने घातला नाही. त्या दिवशी त्याला किती मी मारले. गरीब आहे हो उदय.” असे म्हणता म्हणता त्या मातेच्या डोळयांत पाणी आले.

“उगी. रडू नका. उदय चांगला होईल. तुम्ही बर्‍या व्हाल. आज ना उद्या येईल. तो आला की, तुमचा आजार एकदम बरा होईल. नका रडू. मुलगा उद्या नोकरीला लागेल. तुमचे कष्ट संपतील. सुखात राहाल.”

“बाळासाठी कष्ट करीत होत्ये. ते कष्ट नसत हो वाटत. आनंदच वाटे आणखी दोन हात असते तर आणखी काम केले असते. त्याला थोडे अधिक पैसे पाठविले असते. थोडे दूध घेता. उदय दिसतो कसा? उंच, गोरा. आणि त्याचे डोळे तुम्ही पाहिले आहेत का? त्याच्या वडिलांचे डोळे असेच होते. ते डोळे पाहण्यासाठी पुन:पुन्हा जन्म घ्यावा. उदयच्या अंगावर थोडे मांस हवे होते. राजबिंडा दिसला असता. परंतु कोठून आणू दूध-तूप?”

“आमची नली उदयच्या डोळयांचे वर्णन करीत असते. तिने तुमच्या उदयला दोन पत्रेही मुंबईहून पाठविली होती. त्याच्या डोळयांवर तिने कविता केल्या होत्या, सांगत होती.”

“तुमची नली हुशार आहे.”

“तिचे यंदा लग्न करावयाचे म्हणत आहोत.”

“परंतु आणखी एक वर्ष शिकवणार ना?”

“चांगले स्थळ मिळाले तर कशाला शिकवायचे? एका जहागीरदाराचा मुलगा आहे. जमेल असे वाटते. तुम्ही बर्‍या व्हा. नलीच्या लग्नात तुम्ही हव्यात. उदयही येईल.”

“माझी नाही हो आशा. नलू चांगल्या घरी पडो. अशा नक्षत्रासारख्या मुलीला कोण करणार नाही? आणि पुन्हा शिकलेली. ज्याला मिळेल तो भाग्यवान.”

“तुमच्या उदयचे सुध्दा लग्न करायला हवे. सूनमुख पाहा. नातू मांडीवर खेळवा. सुखाचे दिवस पाहा. मग डोळे मिटा. तोवर जगा. उगीच वेडेवाकडे मनात आणीत नका जाऊ. समजलात ना? काही लागले-सरवले कळवीत जा. थोडा मुरावळा पाठवू का?

« PreviousChapter ListNext »