Bookstruck

पंढरपूर 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सरला आणखी काही दिवस तेथे राहिली.

परंतु शेवटी जाण्याचा दिवस आला. तिने बाळाचे पुन:पुन्हा मुके घेतले. आपले चिमणे हात बाळ हलवी. त्याचे डोळे सुंदर होते. तो आता ते उघडू लागला होता.

“त्यांच्या डोळयांसारखेच तुझे डोळे आहेत. बाळ, जाते हो. रडू नको. मी नेईन हो तुला.”

तिला बोलवेना. ती व्यवस्थापकांना म्हणाली, “मी माझे बाळ पुन्हा परत नेईन. हे बाळ कोणाला देऊ नका. येथे संस्था बघायला कोणी येतात. कोणी उदार आत्मे एखादे मूल घेऊन जातात. किंवा एखाद्याला मूल नसेल तर येथले वाढवायला नेतात. माझा बाळ नका देऊ कोणाला. मी सारे पैसे देईन. त्याचा खर्च देईन. परंतु आज माझ्याजवळ काही नाही.”

“तुमचे मूल ठेवू. तुम्हाला शक्य झाले म्हणजे या. बाळ घेऊन जा. त्याची आम्ही काळजी घेऊ. तुम्ही त्याची चिंता नका करू.”

तेथील सर्वांचा निरोप घेऊन सरला निघाली. वळकटी व तांब्या घेऊन निघाली. बाळाच्या पाळण्याजवळ ती उभी राहिली. तिच्या पोटचा गोळा येथे होता. उदयच्या व तिच्या परम प्रेमाला लागलेले ते सुंदर फळ ! तिला तेथून जाववेना. तिचा पाय निघेना. तिने त्याला पुन्हा काढून घेतले. पुन्हा तिने त्याला पाजले. त्याच्याकडे पुन्हा एकदा तिने पाहिले. त्याला हृदयाशी धरले.

“बाळ, जाते हो. जाते ही तुझी आई दुर्दैवी, अभागी आई ! सुखी राहा. नेईन हो लौकर तुला.” असे म्हणून कष्टाने त्याला पाळण्यात ठेवून सरला रडत बाहेर पडली. सर्वांना प्रणाम करून पंढरपूर सोडून ती निघाली. सरले, कोठे जाणार तू?

« PreviousChapter ListNext »