Bookstruck

आशा-निराशा 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“होय? खरेच भाग्यवान. उदय न सापडला तरीही मी भाग्यवान आहे. त्याने मला अपार दिले आहे. मी स्वत:ला कशाला भाग्यहीन समजू? त्याच्या अनंत स्मृती  माझ्याजवळ आहेत. त्याने मला प्रेमाचे शत स्वर्ग दाखविले. नंदनवनातून फिरविले. अमृताच्या समुद्रात आम्ही डुंबलो. परोपरीचे खेळ खेळलो. रडण्याचे, हसण्याचे खेळ. रुसण्या-रागवण्याचे खेळ. मी त्याला म्हणायची, “उदय, तुझे माझ्यावर प्रेम असेल तर गालावर चापट मार.” आणि तो हळूच मारी. मी त्याच्या नाकावर टिचकी मारी. गंमत किती तुम्हाला सांगू? शब्द अपुरे पडतील. हे पहा अंगावर रोमांच उभे राहिले. जणू माझ्या जीवनात तो नाचत आहे. माझा अणुरेणू फुलवीत आहे. हे काय नलू? तुला वाईटसे   वाटले? तुला का माझ्या प्रेमाचा मत्सर वाटला? प्रेम मत्सरी असते, परंतु नलू, माझा मत्सर नको करूस. उदय सहज आला व माझ्या जीवनाचा राजा झाला. ना प्रयत्न ना काही. जणू आम्ही अनेक जन्मींची एकमेकांची होतो. इतक्या दिवस एकमेकांस धुंडीत होतो. जणू जागा चुकलो होतो परंतु परस्परांस आम्ही पाहिले व मिळून गेलो. नलू, तूही एक स्त्री, मीही एक स्त्री. स्त्रीला स्त्रीने नको का सहानुभूती दाखवायला? मी जन्मजात दु:खी आहे. तुला काय सांगू? उदयचा माझ्या जीवनात उदय झाला, नि माझ्या जीवनात प्रकाश आला. माझे नष्टचर्य आता संपले असे मला वाटले. जीवनाची अश्रुतपश्चर्या फुलली, फळली असे वाटले. परंतु दुर्दैव अद्याप पाठीशी आहे. उदय येतो असे सांगून गेला. परंतु ना त्याचे पत्र, ना पत्ता. मी कावरीबावरी झाल्ये. मी घरातून बाहेर पडल्ये आहे. भेटली प्रेममूर्ती तर ठीक नाही तर हा देह नर्मदा-तापीला, गंगे-गोदेला कोठे तरी अर्पण करीन. मला ते धैर्य येवो.”

“सरले !”

“काय?”

“पड जरा. माझ्या मांडीवर डोके ठेवून पड. मी नाही हो मत्सर करणार. मी कशाला मत्सर करू? मी त्याग केला असता तर मत्सर केला असता. माझ्या प्रेमाची गंगा ढोपरभरसुध्दा खोल नव्हती. तुझा प्रेमसागर आहे. धो धो करीत तो उचंबळत आहे. तू कसे वर्णन करीत होतीस? जणू कवयित्री झाली होतीस. तुझे अनुभवाचे बोल होते. खरे प्रेम तू चाखले आहेस आणि म्हणूनच घरदार सोडून बाहेर पडण्याचे धैर्य आले आहे. प्रेमाचे परमामृत चाखल्यामुळेच तू मरायलाही तयार होशील. कारण एरव्ही सारे जीवन तुला फिके वाटेल. जो एकदा अमृत प्यायला, तो का पुन्हा ओठाला कांजी लावील? जो उंच गगनात विहार करायला शिकला, तो का धुळीत लोळेल? सरले, तुझे प्रेमाचे निधान तुला मिळो. तुझा उदय तुला भेटो. दुसरे मी काय इच्छू? सुखी व्हा.”

दोघी मैत्रिणी स्तब्ध होत्या.

“सरले, नीज जरा. मी तुला थोपटते. तू उदयची होतीस म्हणून का मला  तुझ्याविषयी काही तरी वाटे? जणू तुझ्या रोमरोमांत भरलेला उदय नकळतपणे मला दिसत होता. मला तुझ्याकडे ओढीत होता. तू केवळ सरला नाही उरलीस. उदय नि सरला या दोघांची मिळून तू मूर्ती बनली आहेस. उदयचे डोके माझ्या मांडीवर घेण्याचे भाग्य मला नाही. परंतु जिच्या मांडीवर उदयने डोके ठेवले असेल तिचे डोके तरी या मांडीवर मला घेऊ दे. ही मांडी कृतार्थ होऊ दे. ये सरले, नीज. तुला मी थोपटते.”

आणि नलीने सरलेला निजविले. तिने तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले. ती तिला थोपटीत होती. गाणे गुणगुणत होती. आणि सरलेला झोप लागली. नलूने तिच्याकडे पाहिले.

« PreviousChapter ListNext »