Bookstruck

कुंटणखाना 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“अहो, तुम्ही शेटसावकार आणल्यावर तुमचीही बूज होईल. कृतज्ञता जगात आहेच. सुंदराबाई काही तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. तुमच्यावरही त्या कृपा करतील. आणि तुम्ही रामाचे पुजारी ! असा पुण्यवान पुरूष त्यांना कधी मिळणार? तुमचे हात किती पवित्र ! तुमच्या हातांचा स्पर्श होणे म्हणजे महाभाग्य ! तुमच्या हातांचा स्पर्श ज्याला होईल तो का पापी राहील? सुंदराबाई, येथे पाप ही वस्तू नाही. हे रामाचे पुजारी आहेत. यांचे पवित्र पाय येथे लागत असतात. या आश्रमाला त्यांचे सदैव आशीर्वाद असतात. नाशिकची यात्रा करणार्‍या मोठमोठया श्रीमंतांना ते येथल्याही यात्रेसाठी घेऊन येत असतात. ते तुझी आता जाहिरात करतील. तुला काही कमी पडणार नाही.”

“जिला असे मस्त सौंदर्य आहे, तारूण्य आहे तिला काय कमी? खरे ना सुंदराबाई?”

“तुम्ही काय बोलत आहात? तुम्हांला लाज कशी नाही? व्हा चालते येथून. रामाचे तुम्ही पुजारी ना? आणि येथे अशा नरकात तुम्ही येता? गरीब स्त्रियांची विटंबना मांडता? व्हा चालते ! तोंड दाखवू नका !”

ती दोघे हसली.

“हळूहळू नरम व्हा ! तुमचे रागावलेले तोंड किती छान दिसते ! वाहवा, वा: !”

“पाप्या, चांडाळा !” सरला ताडकन उठून म्हणाली.

“दे प्रसाद. मार या गालावर. तुझा कोमल हात लागून हे गाल कृतार्थ होऊ देत. मारायचे का?”
सरलेने तोंड फिरविले. तिला संतापाने रडू आले. ती दोघे निघून गेली. दुपारी तिला पंचपक्वान्नांचे जेवण आले. फळफळावळ आली. मेवा-मिठाई आली. ती नुसते पाणीच पिऊन राहिली. ते सारे मेवे तिला विषासमान होते. तिसरे प्रहरी ती राक्षशीण पुन्हा आली.

“तू काही खाल्लेस की नाही?”

“मला विष आणून द्या.”

“आज सायंकाळी तू खिडकीत उभे राहिले पाहिजे.”

“मला येथे टांगा, फाशी द्या !”

“ते सारे योग्य वेळी करण्यात येईल.”

“तुम्ही माझ्यावर अत्याचार करणार असाल, जुलूम करणार असाल तर मी जीव देईन.”

« PreviousChapter ListNext »