Bookstruck

उदय 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“उदय, ध्येय हे दूर असते. परंतु जीवनात विवेक हवा. कोणते प्रेम सत्य? एका व्यक्तीवरचे प्रेम ही का विश्वव्यापी सत्यता? त्या प्रेमाला अर्थ आहे. परंतु त्या प्रेमाने पागल होऊन वा निराश होऊन सार्‍या दुनियेला लाथ मारायला नये उठू. ते प्रेम तुम्हाला हळुवार करू दे. अधिक प्रेमळ करू दे. ते प्रेम तुम्हाला सहानुभूती शिकवू दे आणि शेवटी जगासाठी मरायला शिकवू दे.”

“मित्रा, मी जातो.”

“कोठे जातोस? मरणाकडे की जीवनाकडे? एका व्यक्तीच्या विचारात गुंग होणार की विराट जनतेचे दु:ख दूर करण्यासाठी स्वत:चे जीवन देणार? कोठे जातोस?

“ते मी काय सांगू?”

“मग कोण सांगणार?”

“अदृश्य सरला माझी पावले वळवील. ती नेईल तिकडे मी जाईन. जातो. प्रणाम.”

“क्षमा करा. मला प्रवचन देण्याचा काय अधिकार?”

“तुमची तळमळ पाहून मी चकित झालो.”

“परंतु जगा. या विश्वाच्या वेलीवर हसा. विश्वाचा अनंत वेल पाहा.” उदय निघाला. त्या दोघांनी  एकमेकांकडे पाहिले.
“तुमचे नाव काय?”
“माझे नाव मधू.”

“गोड नाव.”

“तुमच्या जीवनात ते आशेची गोडी आणणार असेल, तर ते गोड आहे.”

“आपण पुन्हा कधी भेटू?”

“तुम्ही जगलेत तर भेटू. प्राणत्याग केलात तर कसे भेटू? तुम्ही कोठे जाणार? तुमचा पत्ता काय?”

“मला घर ना दार. आज कोठला देऊ पत्ता?”

“माझा पत्ता हवा का?”

“आता मला काही नको. मनाने मरणाचा जप करीत असताना नवीन गुंते कशाला?”

“संतांच्या डोळयांसमोर सदैव मरणाची स्मृती असते. परंतु म्हणूनच ते अधिक संग्राहक असतात. नित्य नवे संबंध जोडीत असतात. प्रेम देत असतात. मरणाच्या स्मरणाने अधिक जगता आले पाहिजे.”

“परंतु माझे मरणाचे स्मरण मरण्यासाठी आहे.”

« PreviousChapter ListNext »