Bookstruck

आजोबा नातू 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बाळाने आजोबांकडे पाहिले. लबाड कसा गोड हसला ! आजोबांनी नातवास पोटाशी धरले.

“तुमचे दु:ख मी समजू शकतो. घेऊन जा मूल. नीट वाढवा. पत्र येथे लिहून ठेवा.” व्यवस्थापक म्हणाले. विश्वासरावांनी पत्र लिहिले:

“चि.सौ.प्रिय सरलेस कृतानेक सप्रेम आशीर्वाद.

मी तुला सौभाग्यवती लिहीत आहे. उदयचे व तुझे नाते पतिपत्नीचे होते असे मी मानतो. मी तुमच्या नात्यास संमती देतो. उदय खात्रीने कोठे तरी असेल म्हणूनही मी सौभाग्यवती असे तुला लिहीत आहे. तुला केव्हा पाहीन असे मला झाले आहे. तू जीव दिलास असे मी उदयला सांगितले. तो माझ्याकडे आला होता. आणि उदयने जीव दिला असे तुला सांगितले. परंतु प्रसूत होईपर्यंत तरी तू जिवंत होतीस. कोणालाही बाळ देऊ नका असे सांगून तू गेलीस. यावरूनही कोठे तरी तू जिवंत असशील. उदयही जिवंत असेल. मला तसे वाटत आहे. अनुतप्त हृदयाला खरे काय ते जणू समजत असते. सरले, तुझा बाळ मी नेत आहे. त्याला प्रेमाने वाढवीन. तूही लौकर परत ये. उदयही येऊ दे. माझे घर तुमचे आहे. तुमच्यासाठी ते मी सांभाळून ठेवीत आहे. परंतु पित्याचे तोंड बघायचेच नाही असे तू ठरविले असलेस तर? तर तुझे बाळ मी तुला परत देईन. तू सांगशील तेथे आणून देईन. तुझ्या बाळावर तुझा हक्क.

सरले, पित्याला क्षमा कर. सारे विसरून माझ्याकडे ये. मी एकटा आहे. रमा गेली. रमेचा बाळ गेला. परमेश्वर जणू कठोर होऊन मला शिकवीत होता. आणि शिकलो. नवीन डोळे मला आले. नवीन दृष्टी आली; जणू या जीवनात पुनर्जन्म झाला. तुझी मी वाट पाहात आहे.

तुझा पिता-विश्वासराव.”

अशा अर्थाचे पत्र त्यांनी तेथे लिहून ठेवले. व्यवस्थापकांनी कपडे वगैरे लेववून बाळ आणले. दुलई वगैरे दिली.

“सांभाळा. आयांचे काम तुम्हाला करावे लागेल. हगू होईल, मुती होईल, कराल ना नीट? न्याल ना सांभाळून? बाटलीत दूध वगैरे घ्या. की येथूनच भरून देऊ?” व्यवस्थापकांनी विचारले.

“मी गावातून घेईन. ही संस्थेला देणगी. पुढे आणखी पाठवीन. तुमचे उपकार आहेत. फार थोर कार्य तुम्ही चालवले आहे.”

“समाजाला ही जाणीव अधिकाधिक व्हावी हीच इच्छा आहे. परंतु समाजाला उदार दृष्टी आली तर असे प्रसंगच येणार नाहीत. आईबाप, सासू-सासरे उदारपणे वागले तर स्त्रियांना येथे यावे लागणार नाही. सहानुभूतीचा उदार धर्म आला पाहिजे. असो.”

विश्वासराव बाळाला घेऊन गेले. टांगा निघाला. बाळ सभोवती पाहात होता. मध्येच आजोबांच्या मिशा ओढत होता. त्यांचे नाक धरीत होता. टांगा भटजींच्या घरी आला.

“काय हो, हे मूल आणलेत की काय?”

“होय. याला घेऊन जाईन. आमच्या घरी मूलबाळ नाही. याला वाढवीन.”

« PreviousChapter ListNext »