Bookstruck

सनातनींची सभा 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कोणी येत नाही, जात नाही. आणि लोकांना का माहीत नाही? मोटार येथे येते ते का ठाऊक नाही? परंतु पैशाने पापावर पांघरूण पडते. नेऊ का? जातोच घेऊन. तिच्या संगतीचा आज भरपूर आनंद लुटू दे. परंतु येथल्या गलबल्यात नको.”

“जा घेऊन. मी सांगतो.”

रामभटजी काही बोलणेचालणे करून आले. शेटजींनी खिशातून हजाराची नोट काढून दिली.

“इतके कशाला शेटजी?”

“घ्या हो. लाखाची नोटही असती तरी दिली असती !”

सरला निघाली. शेटजींच्या पाठोपाठ तो शेला अंगावर घेऊन निघाली. खाली मोटार होती. मोटारीत बसून दोघे गेली. बंगला आला. शेटजी व सरला गच्चीत बसली होती. आकाशातून अनंत तारे प्रेमाने त्यांच्याकडे पाहात होते. सरलेने शेटजींना सारी हकीकत सांगितली आणि शेवटी म्हणाली,

“मला तुमची मुलगी माना. मुंबईस कोठे काम द्या. मी शाळेत शिकवीन आणि माझा बाळ पंढरपुराहून घेऊन येईन. बाळ वाट पाहात असेल.”

“तुझी सारी व्यवस्था करीन. माझ्याच मुलींना तू शिकव. राहायला स्वतंत्र जागा देऊ. तुझ्या बाळाला घेऊन येऊ. सरले, उद्या आमची परिषद आहे. वर्णाश्रम परिषद. काय तेथे सांगू, काय बोलू? एक शब्दही माझ्याने बोलवणार नाही. कसला हा धर्म ! शिवाशिवीचा धर्म ! श्रेष्ठ-कनिष्ठपणाचा, भेदांच्या बुजबुजाटाचा धर्म ! आम्ही अशी पापे करीत आहोत, आणि पुन्हा धार्मिक म्हणून मिरवत आहोत ! अस्पृश्य बंधू देवाच्या दर्शनाला येऊ इच्छितात. आणि आम्ही त्यांना विरोध करणार. आणि आमच्या देवांचे रामभटजींसारखे पुजारी, आणि माझ्यासारखे भक्त ! आमच्यापेक्षा ते अस्पृश्य शतपटींनी पवित्र असतील. त्यांच्यात दंभ, असत्य, अहंकार, आळस कितीतरी कमी असेल. जगात कोणी अस्पृश्य व्हायला लायक असतीलच, तर ते आम्ही. वरचे प्रतिष्ठित वर्ग. पापे करून वर पुन्हा धार्मिक म्हणून मिरविणारे ! लोकांना लुबाडून लाखोंची कमाई करून रामरायाला शेला देणारे ! आयाबहिणींची अब्रू घेऊन “रामा हो” म्हणून ओरडणारे ! सरले, तू माझ्या डोळयांत अंजन घातलेस. तुझे पाय धरू दे.”

“शेटजी, मी तरी कोठे अगदी निर्दोष आहे ! आपण सारी चुकणारी माणसे. आपण प्रभूचे पाय धरू. आणि तुमच्यातही काही चांगुलपणा आहेच. तुम्ही केवळ कामांध असता तर हा शेला पाहून का विरघळलेत; मी निमित्तमात्र. प्रभूचे आभार मानू, त्याच्या पाया पडू.”

“उद्या परिषदेत हे तोंड कसे दाखवू?”

« PreviousChapter ListNext »