Bookstruck

बहिण-भाऊ 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बहीण आपल्या आयुष्याच्या शेल्याने भावाला पांघरवीत आहे. भाऊ आहे तोपर्यंत चोळीबांगडीची चिंता नाही. शेजीला बहीण म्हणते :

शेजी चोळी ग फाटली        चिंता नाही ग वाटली
दुसरी पाठविली                        भाईरायांनी ॥

असा संसार चालतो. बहिणीची एकच इच्छा शेवटी असते की, सौभाग्यपणी मरण यावे. त्या क्षणी भावानेही यावे. अहेवपणी आलेले मरण भाग्याचे. भावाने शेवटचे चोळीपातळ नेसवावे. जर चंद्र नसता कृष्णपक्षात मरण आले तर मोक्ष नाही. भावाने चंद्रज्योती पाजळून प्रकाश करावा, भरल्या कपाळाने बहीण गेली, तिचे सोने झाले. भावाने आनंद मानावा :

अहेवा मरण                      सोमवारी आलें
भाऊ म्हणती सोनें झालें            बहिणीचें ॥
अहेवा मरणाचा                 आहे मला वांटा
चोळी पातळ कर सांठा               भाईराया ॥
जीव जरी गेला                  कुडी ठेवावी झांकून
येईल सर्वही टाकून                   भाईराया ॥
जीव माझा गेला                 जर काळोख्या रे रात्री
सख्या लाव चंद्रज्योती               भाईराया ॥

अशा ह्या बहीणभावंडांच्या प्रेमाच्या ओव्या आहेत. ह्या प्रेमाचे मी किती वर्णन करू ? स्त्रियांचाच अभिप्राय ऐका :

भावा ग बहिणीच्या          प्रेमाला नाही सरी
गंगेच्या पाण्यापरी                    पवित्रता ॥
भावा ग बहिणीचें            गोड किती असे नातें
कळे एका हृदयातें                    ज्याच्या त्याच्या ॥
संसारीं कितीक               असती नातीं गोतीं
मोलाची माणिकमोती              बहीणभाऊ ॥
जन्मून जन्मून               संसारांत यावें
प्रेम तें चाखावें                          बहिणभावांचें ॥

« PreviousChapter ListNext »