Bookstruck

मुलगी 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रसपरिचय

तान्हेबाळाचे वर्णन आपण पाहिले. आता तान्हेबाळीचे जरा पाहू या. या प्रकरणात मुलीचे लग्न होऊन ती प्रथम सासरी जायला निघाली. तेथपर्यंतच्या ओव्या दिल्या आहेत. आईकडची जीवनयात्रा संपवून आपल्या नवीन संसारास सुरुवात करावयास ती जाते येथपर्यंतच्या ओव्या येथे आहेत. आपल्याकडे मुलापेक्षा मुलीचे माहात्म्य कमी मानतात. मुलगा झाला की, महोत्सव मानतात. मुलगी झाली तर जरा कष्टी होतात. या ओव्यांत आरंभीच सांगितले आहे की, मुलगी झाली म्हणून हे माते कष्टी नको होऊ :

कन्या झाली म्हणून         नको करूं हेळसांड
गोपूबाळाच्या शेजारी             उषाताईचा पाट मांड ॥

सासूबाई बहुधा सुनेला सांगत आहेत. मुलीचा पाट बापाजवळच मांड. मुलीची हेळसांड नको करू. मुलगी झाली म्हणून काय झाले ? कन्यादानाचे पुण्य घडेल :

कन्या झाली म्हणून         नको घालूं खाली मान
घडेल कन्यादान             काकारायांना ॥

कन्यादानाचे महत्त्व पुढील ओवीत किती सुंदर रीतीने सांगितले आहे पहा :

कन्यादान करुनी         कन्या एकीकडे
पृथ्वीदान घडे                 काकारायांना ॥

पृथ्वीदान दिल्याचे पुण्य कन्यादानात आहे. पृथ्वी असेल तर फळेफुले होतील, धनधान्य वाढेल. स्त्री असेल तरच संसार. नाही तर स्मशानच आहे. अशा या कन्येचे माहात्म्य कमी मानू नये. मुलगा हिरा असेल तर मुलगी हिरकणी आहे:

लेका ग परीस             लेक ती काय उणी
हिरा नव्हे हिरकणी             उषाताई ॥

या मुलीचे मोठे सुंदर वर्णन केलेले आहे. पायी पैंजण घातलेली ती मैना आहे, ती मखमल आहे, ती चंद्रज्योत आहे, किती तिला उपमा. तिला परोपरीचे खेळ आणून देतात.

शिंपली कुरकुली         बुरुडाला सांगणार
मैना माझी खेळणार             उषाताई ॥

बुरडाला लहान लहान सुपल्या तिच्यासाठी करायला सांगतात. असे तिचे कौतुक होत असते. तिला दागदागिने करतात :

सोनाराच्या शाळे         ठिणगुल्या उडती
बिंदुल्या घडती                 उषाताईला ॥

सोनार फुंकणीने फू फू करीत आहे, ठिणग्या उडत आहेत, असे हे हुबेहुब चित्र उभे केले आहे.

« PreviousChapter ListNext »