Bookstruck

मुलगी 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मुलगी वाढू लागते व आईबापांच्या आनंदाबरोबर चिंताही मनात वाढू लागते :

मुलगी वाढते             जशी चंद्रम्याची कोर
बापाला पडे घोर             अंतरंगी ॥

आणि अशा बर्‍याच मुली असल्या म्हणजे मग किती चिंता असेल ! परंतु मुली बापाला म्हणतात :

बाप्पाजी हो बाप्पा         लेकी फार म्हणूं नका
जसा चिमणुल्यांचा थापा         उडून जाई ॥

किती सहृदय व करुण ओवी. चिमण्या क्षणभर अंगणात खेळतील. निघून जातील. बापही मग शेजीला म्हणतो :

सगळया झाल्या लेकी         शेजी म्हणे झाल्या झाल्या
बाप ग म्हणतो                 दाही दिशा चिमण्या गेल्या ॥

परंतु चिमण्या सासरी पाठवायला किती चिंता ! लग्न जमवणे हिंदुस्थानात किती कठीण. बाप म्हणतो :

बाप म्हणे लेकी         लेकी गुळाचे घागरी
लावण्यरूप तुझे                 घालू कोणाचे पदरी ॥
बाप म्हणे लेकी         माझे साखरेचे पोतें
तुझ्या नशीबाला             जामीन कोण होतें ॥

बापाला मुलगी गुळाची घागर, साखरेचे पोते असे वाटते. परंतु असे हे रत्‍न कोणाच्या पदरी घालायचे ?

मुलीला पाहायला येऊ लागतात. पूर्वी लहानपणी लग्ने होत. जरीचे परकर घालू वगैरे बोलणी होतात. येणारे घरदार पाहतात. मुलीचा बाप म्हणतो :

नवरी पाहूं आले         काय पाहता कूडभिंती
मुलगी सुरतेचे मोती             उषाताई ॥

आमचे घर नका पाहू. कुडाच्या भिंतीचे साधे घर. परंतु साध्या शिंपल्यात मोती असते. माझी मुलगी म्हणजे साधे मोती नसून गोलबंद पाणीदार सुरतेचे मोती आहे. तसेच नवरा मुलगा पाहायला गेल्यावर मुलीच्या बापाला चार सज्जन म्हणतात :

नवरा पाहूं गेले             काय पाहता वतनाला
मुलगी द्यावी रत्‍नाला             उषाताई ॥

घरदार, वतनवाडी काय पाहता ? मुलगा चांगला असला म्हणजे झाले.

स्थळ पाहतांना             नका बघू घरदार
जोडा बघा मनोहर             उषाताई ॥

« PreviousChapter ListNext »