Bookstruck

सुखदु:खाचे अनुभव 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रसपरिचय

मागील प्रकरणात आपण मुलीचे लग्न लागून ती प्रथम सासरी जाते तोपर्यंतचा प्रकार पाहिला. आता या प्रकरणात संसारातील सारे बरेवाईट अनुभव ओव्यांत ओतलेले तुमच्यापुढे ठेवले आहेत. सासुरवास हा शब्दच किती भयंकर आहे. परंतु कितीही सासुरवास असला तरी सासरीच राहावयाचे. माहेरी फार तर दोन दिवस. स्त्रिया सांगतात :

सासरी सासुरवास         माहेरी माहेरवास
सत्तेचा परी घांस             सासर्‍यास ॥

लग्न लावून एकदा सासरी मुलगी गेली म्हणजे मग माहेरी कोणती सत्ता ? कधी एखादे लुगडे, खण फार तर मिळायचा. वटसावित्रीच्या त्या अमर गाण्यात सावित्री यमदेवाला म्हणते :

मापिलेंच देई माता         मापिलेंच देई पिता
माझा उमोप दाता             देई रे आतां ॥

आई मोजके देईल, बाप मोजके देईल, परंतु पती हा मोजमाप न करता देणारा आहे. अशा या पतिदेवाकडे पाहूनच सारे सासरचे इतर हाल नववधू विसरते. सासरच्या वर्णनात स्त्रियांनी किती सुंदर उपमा दिल्या आहेत. सासरचे बोल म्हणजे कार्ल्याचे वेल, रेशमाच्या गाठी, वळचणीचा येता जाता लागणारा वासा, सडसड येणारे पाण्याचे शिंतोडे, मिरच्यांचे वा निवडुंगाचे काटेरी घोस, विषाचे पेले- कोणती द्यावी उपमा ? परंतु असे हे सासरचे हाल मुलगी का सोसते ? सारी कटू बोलणी मुकाटयाने का सहन करते ? आपल्या आई-बापांच्या नावाला कमीपणा येऊ नये म्हणून :

सासरचे बोल             कडू विषाचे ग प्याले
तुझ्यासाठी गोड केले             मायबाई ॥
सासूचा सासुरवास         रडवीतो पदोपदीं   
लेक थोराची बोलेना             कोणाशी परी कधीं ॥
सासरचे बोल             जसे निवडुंगाचे घोस
शीलवंतांच्या मुली सोस             उषाताई ॥

सासरी माहेरचा भाऊ आलेला असावा. त्याच्या कानांवर घरातले बोल येतात. आपल्या बहिणीला कसे टोचून बोलतात हे तो चोरून ऐकतो. त्याचे डोळे भरून येतात :

सासरचे बोल             भाऊ ऐकतो चोरोनी
नेत्र येतात भरोनी             भाईरायाचे ॥

लग्नापूर्वी वडिलांनी पाहिले असते तर. परंतु वडिलांनी फार काळजी घेतली नाही :

बापे दिल्या लेकी         आपण बसले सुखे ओटी
मायेला चिंता मोठी            वागण्याची ॥

बाप ओटीवर पानसुपारी खात बसला तरी मुलीला कसे वागवतील याची आईला काळजी; आणि मुलगीही सासरच्या हालात कशी वागते ती काळजी. परंतु मुलगी आईबापांस निश्चित करते :

चंदनासारखी             देह मी झिजवीन
लेक तुमची म्हणवीन             बाप्पाजी हो ॥

चंदन आपला सुगंध पसरते, त्याचप्रमाणे सासरच्या हालांनी झिजून माझ्या चारित्र्याचा सुगंध पसरेल. सासरी गेलेली लहान मुलगी. तिला भूक लागते. तिचे वाढण्याचे वय, परंतु कोणाजवळ बोलणार ? ती पोट आवळून बांधते :

भूक लागते माझ्या पोटा     परवंटा देत्ये गांठी
तुमच्या नांवासाठी             बाप्पाजी हो ॥

सासरी सारीच बोलणार. सासू-सासरे, दीर-नणंदा सर्वांचाच बोलण्याचा अधिकार. पहाटेपासून प्रहरभर रात्र होईपर्यंत राबराब राबावे, भारतीय स्त्रिया काय म्हणतात ऐका :

सासुरवाशिणी             तूं ग वाडयातला बैल
कधी रिकामी होशील             उषाताई ॥
स्त्रियांचा हा जन्म         नको घालूं सख्या हरी
रात्र ना दिवस                 परक्याची ताबेदारी ॥
नाचण्याचा कोंडा         नाही कशाच्या काजा कामा
मुलगीचा जन्म राया             देऊं नये ॥

आपण किती म्हटले की, आम्ही स्त्रियांना देवतांप्रमाणे वागवतो, तरी स्त्रियांचा अभिप्राय तोच खरा. या भारतात स्त्रियांचा जन्म नको, असे आपण म्हणायला लावले. याची लाज भारतीय पुरुषांना वाटली पाहिजे, सासरच्या मंडळीस वाटली पाहिजे :

सकाळी उठून सडासारवणाचे काम असते. देवा-तुळशीला नमस्कार असतो :

सकाळी उठून             सडा घालूं गोमूत्राचा
माझ्या ग कंथाचा             वाडा आहे पवित्राचा ॥

माझ्या पतीचा वाडा पवित्र आहे. सर्वत्र स्वच्छता ठेवली पाहिजे. शिवाय आमच्या घरावरून देवळाचा रस्ता जातो. सकाळी लोक देवदर्शनाला जातील. रस्ता स्वच्छ ठेवला पाहिजे :

सकाळी उठून             काम करित्यें घाईघाई
माझ्या ग दारावरून             मंदिराची वाट जाई ॥

« PreviousChapter ListNext »