Bookstruck

ऐतिहासिक व देशाच्या 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दोघे भाऊ अंबारीत बसून शनिवारवाड्यात जातात असे वर्णन आहे. चिमाजीअप्पा व बाजीराव गेले आणि शेवटच्या काळात दुसरे बाजीराव आले. ह्या दुसर्‍या बाजीरावांची एकच ओवी मिळाली :

चिमणाजी बाजी गेले         दुसरे बाजीराव कैसे झाले
सारें पुणें धुंडाळीलें             पैशासाठी

आणि नारायणरावांच्या वधाची ती दु:खद घटना! तिच्यावर हृदयाला घरे पाडणार्‍या अशा ओव्या आहेत :

नारायणरावाला मारीलें         हाडाचे केले फांसे
आनंदीबाई हांसे                 पुण्यामध्यें

नारायणरावांच्या हाडांचे फासे करून आनंदीबाई सारिपाट खेळते, हसते यातील विरोध अत्यंत तीव्र आहे. गंगाबाई गरोदर, माहेरी गेलेली. दुपारची वेळ होती. नारायणराव जेवून उठले होते. लवंग-सुपारी खात होते. मरणाची कल्पनाही ध्यानीमनी नाही :

नारायणरावाला मारीलें         मारीलें दुपारी
त्यांनी खाल्ली होती             नुकती लवंग-सुपारी

किती सहृदय व करुण ओवी, देवही नारायणरावांचा साहाय्यकारी झाला नाही. रघुनाथराव आनंदीच्या अर्ध्या वचनात, गंगाबाई माहेरहून येईपर्यंत नारायणरावाचे प्रेत झाकून ठेविले होते. ती आल्यावर रडू लागली. परंतु आनंदीबाई काय करीत होती ?

नारायणरावाला मारीलें         गंगाबाई रडे
आनंदीबाई पेढे                 वांटीतसे

आनंदीबाईने राज्य स्वत:च्या पतीसाठी व पुत्रासाठी मिळविले.

आनंदीबाई             जशी कैकयी दुसरी
गिळिलें ग राज्य             जसें माणीक सूसरीं

पुढे राज्य दुसर्‍या बाजीरावाच्या हाती गेले, हा नवा धनी प्रजेला कितपत मानवला? समुद्र आटावा व मग माशांनी तडफडावे तसे प्रजेला झाले:

समुद्र आटला             मासा करी पाणी पाणी
राज्याला झाला धनी             बाजीराव

मराठ्यांच्या या फुटाफुटीचा इंग्रजांनी फायदा घेतला. आपसातील भांडणामुळे परक्यांचे फावले.

आनंदीबाईने             लोकी भांडण लावीलें
म्हणून फावलें                 इंग्रजाला

« PreviousChapter ListNext »