Bookstruck

ऐतिहासिक व देशाच्या 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

यातील नारायण शब्दात नारायण पेशव्यांची आठवण आहे का ? गुणहीन राष्ट्र मरते. परंतु वाईट दिवस का नेहमीच असतात ? भरलेले घट रिकामे होतात, रिकामे भरतात. जगाच्या संसाराला सदैव भरती ओहोटी आहे. पुण्याला पुन्हा तेज चढेल. पुणे शहरात पुन्हा नवहिंदुस्थानचे राजकारण खेळू लागेल. कारण लोकमान्य टिळक अवतरले आहेत ना !

पुण्याचे वैभव             पुन्हा दिसेल इळक
तेथें आहेत टिळक             देशभक्त

आणि टिळकांच्या मूर्तीचे हे वर्णन वाचा :

पुण्याची पुण्याई         पुन्हा ग उदेली
मूर्ति सांवळी जन्मली             टिळकांची

ही ओवी जर पत्राचार्य अच्युतराव कोल्हटकरांना मिळाली असती तर ते नाचले असते. लोकमान्यांनी स्वदेशीचा मंत्र महाराष्ट्रभर नेला. गांवोगाव स्त्री-पुरुषांनी स्वदेशीच्या शपथा घेतल्या. त्या वेळचे वातावरण अति तीव्र भावनांचे होते. बायांनी स्वदेशी बांगड्या, स्वदेशी वस्त्रे वापरण्याचा निश्चय केला. त्यांच्या ओव्यांतून राजकारण रंगले :

बायांनो नटूं नका         परदेशी ग चिटानें
बुडती कारखाने                 साळीयांचे
विदेशी बांगडी             नको भरूं ग हातात
अन्नान्न देशांत             चोहींकडे

आज बहुतेक सारेच चहा पितात. परंतु तो आठ सालचा काळ. चहा साखर्‍या वर्ज्य झाला. साखर आज बहुतेक सारी स्वदेशात होते. परंतु त्या वेळची सारी मोरस साखर, मॉरिशसची साखर, चहावरील ही टीका ऐका :

चहाचें व्यसन             दारूच्या बरोबरी
कपबशा घरोघरी             खुळखुळती
चहाचें व्यसन             कपबशा ग निघाल्या
प्रकृति क्षीण झाल्या             घेणार्‍यांच्या

लोकमान्यांना ती सहा वर्षाची शिक्षा होते. सार्‍या देशावर कृष्णछाया पसरते. महाराष्ट्रात सारे दु:खी होतात. ती सहा वर्षे गेली. लोकमान्य सुटून आले. सरकारने आधी वर्दी न देता एकदम वाड्याशी त्यांना आणून सोडले :

टिळक सुटले             रात्रीचे साडेबारा
देशोदेशी गेल्या तारा             देशभक्तां

लोकमान्यांना कोणी दत्ताचे अवतार मानीत. आणि जगच्चालकाला केलेली ही प्रार्थना ऐका :

पहिली माझी ओवी         जगाच्या पालका
रक्षी टिळक बाळका             रात्रंदिवस

आणि तो मुळशीचा सत्याग्रह ! त्या वेळेस मुळशीचा पाळणा आणि इतर गाणी जिकडेतिकडे गेली. टाटा म्हणजे गरिबांच्या पायांतील काटा, असे बायामाणसे म्हणू लागली. त्या सत्याग्रहात स्त्रियाही सामील झाल्या. त्यांनी पराकाष्ठेचा त्याग केला, कष्ट व छळ सहन केले :

मुळशीच्या सत्याग्रहीं         उडे आधणाचें पाणी
परि सत्याग्रही भगिनी             मानिती तें फुलावाणी

« PreviousChapter ListNext »