Bookstruck

ऐतिहासिक व देशाच्या 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मी एकदा कोकणात माझ्या पालगड गावी गेलो होतो. रात्री सभा झाली. स्त्री-पुरुष जमले होते. माझी वृध्द चुलत चुलती ती. सौ.जानकीकाकू हीही आली होती. दुसर्‍या दिवशी ती मला म्हणाली, “मी एक ओवी केली आहे. तो टिपून घे. तू ओव्या गोळा करतोस. ती ओवी टाकून नको देऊं. तू पुस्तक छापशील त्याला घाल. ही कबूल कर.”

पालगड गांवांत             काँग्रेसची भरली सभा
तेथें राहे हिरा उभा             पंढरीनाथ

जानकीकाकूने एक ओवी सांगताच शेजारची दुसरी एक भगिनी आली. तिने लगेच दुसरी ओवी केली :

पालगडच्या गणपतीला         बदामाचा शिरा
पालगड गांवचा हिरा             पंढरीनाथ

त्या सभेतील वक्त्याचे नाव पंढरीनाथ होते. तो वक्ता त्या गावातीलच होता. गावच्या या मायबहिणींना आपल्या गावातील काँग्रेससेवकाचे कौतुक वाटले. त्यांची प्रतिभा जागृत झाली. त्यांनी ओव्या केल्या.

गांधींची चळवळ ही सर्वांची चळवळ. तीत स्त्रिया-पुरुष, मुले-बाळे सारी भाग घेतात. महात्माजींनी स्त्रियांचा आत्मा जागा केला. त्यांचे हे अपार उपकार आहेत :

गांधीची चळवळ         मुलां बाळां बायकांची
भीति जाईल सर्वांची             मनांतील

आणि स्वराज्यार्थ अहोरात्र झटणार्‍या महापुरुषाला देवाने उदंड आउक्ष द्यावे असे स्त्रिया प्रार्थीत आहेत :

एक देणारे स्वातुंत्र्य         प्रिय देशा हिंदुस्थाना
देई उदंड आउक्ष देवा             महात्मा गांधींना

« PreviousChapter ListNext »