Bookstruck

ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रसपरिचय

स्त्रियांनी उन्हाळा, पावसाळा व थंडी यांचेही वर्णन केले आहे. सूर्य, समुद्र, वसंत यांची ही वर्णने आहेत. पाऊस म्हणजे पृथ्वीचे सौभाग्य. पाऊस नाही तर काही नाही. आकशाकडे सर्वांचे डोळे लागतात. बिरबल म्हणत असे २७ नक्षत्रांतील पावसाची नक्षत्रे वगळली तर शून्य उरते. पाऊस आला नाही वेळेवर तर हायहाय उठते:

पाऊस पडेना             सुकली सारीं तोंडें
राग कां गोविंदें                 केला आहे
पाऊस पडेना             सुकली सारीं तळी
सुकल्या वृक्षवेली             रानीवनी

परंतु देवाला दया येते, आकाशात मेघ जमतात:

पडेल पाऊस             बघा झाले मेघ गोळा
आला हो कळवळा             देवबाप्पा

मेघांचा घिमीघिमी आवाज ऐकू येतो. पावसाळी हवा होते. मोर पिसारे उभारतात:

मेघांची आकाशीं         गर्दी झालेली पाहून
मोर नाचे आनंदून             वनामध्यें

आपल्या माहेरी पाउस पडला असेल की नाही ते बहिणी मनात आणतात. भावाचे शेतभात पिकू दे. भाऊ मग दिवाळीला नेईल :

पड रे पाऊसा             पिकूं दे दाणापाणी
भाईरायाला बहिणी             आठवीती

पावसाळा चांगलाच सुरू होतो. हिरवे हिरवे दाट गवत उगवते. पृथ्वी जणू जाड जोट पांघुरली आहे असे वाटते. जोड शब्द खानदेशात फार आहे :

पाऊस पडतो             पडतो काळाकुट्ट
धरणीमाता हिरवा जोट         पांघुरली
पाऊस पडतो             थांबेना पागोळी
धरणीमाय हिरवी चोळी         घालीतसे

पाऊस पडत असतो. शेतकर्‍यास विसावा नाही. कोकणात तर सारे पावसातच काम. शेतावर गेलेल्या लोकांसाठी बायका भाकर्‍या घेऊन जातात:

पाऊस पडतो             ओल्या झाल्यात कामिनी
भाकरीच्या पाट्या             शेता जातात घेऊनी

पाऊस पडू लागला म्हणजे मुलांना आनंद होतो. त्यांना पाण्यात नाचावे, डुंबावे असे वाटते. परंतु आई म्हणते :

येईल पडसें             पाण्यांत नको जाऊं
घरांत खेळ पाहूं             गोपूबाळा

« PreviousChapter ListNext »