Bookstruck

संकीर्ण 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गोपूबाळ मोठा हुशार. अच्छेर सुपारी त्याने पुरविली.

बैठकीच्या तबकात अत्तरदाणी, गुलाबदाणी व लवंगा, वेलदोडे, जायपत्री, सुपारी, कात वगैरे ज्यात असते तो चौफुला-सर्वांचे वर्णन पहा कसे खुमारीने केले आहे :

अत्तरदाणी गुलाबदाणी         या दोघी ग सवती
दोघींना एक पति             चौफुला तो

चौफुला शब्द पुल्लिंगी आहे. अत्तरदाणी, गुलाबदाणी स्त्रीलिंगी, त्या जणू चौफुल्याच्या बायका !

एका तरूणाला कोणी तरी म्हणते :

अत्तरदाणी गुलाबदाणी         पाचूपेट्या पिंगारदाणी
आहे हौशी तुझी राणी             गोपूबाळा

तुझी राणी मोठी हौशी आहे. सारे तिला हवे. अंगावर पाचूपेट्या हव्यात, अत्तरदाणी-गुलाबदाणी जवळ हवी. विडा खाऊन पीक टाकायला पिकदाणी हवी. रंगेल आहे तुझी राणी. पिंगारदाणी म्हणजे पीकदाणी.

कधी कधी रूपकात्मक अशा अध्यातमपर ओव्या आढळतात :

काय सांगू सखे             आंबा पिकलासे टिक्षी
येतील गरुडपक्षी             घेऊन जाती

हा कोठला आंबा ? गरुड कोण ? आंबा पिकला म्हणजे आयुष्य सरत आले, म्हातारपण आले, केस पिकले, जीवनही जणू पिकले. गोड झाले. काम-क्रोधाचा आंबटपणा जाऊन विचाराचा मधुर रस जीवनात भरला. आता विष्णूचे दूत येतील व हे फळ घेऊन जातील.

रस्त्यात कुंकवाची पुडी वगैरे सापडली तर पतीला भरपूर आयुष्य लाभेल असे स्त्रिया मानतात.

कुंकवाचा पुडा             अक्काबाईला सापडला
आयुष्याचा लाभ झाला             तिच्या कंथा

ओव्या झोपाळ्यावर बसून म्हणायच्या. त्या झोपाळ्याचे वर्णन नाही का केले स्त्रियांनी ? हो, केले आहे तर ! झोपाळ्याला त्यांनी दादा म्हटले आहे. लहान मुले आईला झोपाळ्यावर घेऊन बस असे सांगतात. माता म्हणते :

झोंपाळ्या रे दादा         आम्हांला तुझा लळा
चैन पडेना बाळाला             तुझ्याविण

झोपाळा तुटला म्हणजे मुलाबाळांची निराशा. मग ती बापाच्या पाठीस लागतात. बाप पुन्हा बांधून देतो.

झोपाळा तुटला             आम्ही बसुं कशावरी
दुसरा बांधा दारी             बाप्पाराया

आणि एखाद्या विलासिनीच्या घरच्या झोपाळ्याचे वर्णन ऐकायचे आहे ?

झोपाळा चंदनाचा         त्याला पाचूचें दिलें पाणी
गंजीफा खेळे राणी             गोपूबाळाची

चंदनाच्या झोपाळ्याला पाचूचा रंग दिला आहे. हिरवा रंग दिला आहे. त्यावर बसून आवडती बायको पतीबरोबर गंजीफा खेळत आहे !

असे. हे संकीर्ण प्रकरण नाना रसांचे आहे. ते गोड करून घ्या ही विनंती.

« PreviousChapter ListNext »