Bookstruck

एकदा एक फुलपाखरु कविता कर...

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एकदा एक फुलपाखरु कविता करत बसले

तेव्हा त्याच्या पंखावरले सगळे रंग हसले

हिरवा रंग वदला ’गडया कविता केलीस हिरवी

तर कसा श्रावणासारखा फुलत राहशील एरवी. ’

निळा कुजबुजला, की कविता निळी जमली तर

दिमाखाने उडत राहशील सारखा आभाळाभर

कानाजवळ जाऊन जरा पिवळा वदला हसत

पिवळी कविता पाहिल्यावर चाफा नाही रुसत

जांभळासुद्‌धा बडबडला मग शक्कल काढून नवी

जांभुळवनात भेटायचे तर जांभळी कविता हवी

धिटाईने लाजत लाजत म्हटले पांढर्‍यानेही

पांढरी कविता असते बरे नाजूक विचारवाही

लाल बोलला, ’तुला म्हणून सांगतो माझ्या राजा

लाल कविता झाली तर होईल गाजावाजा.’

एवढयात पुढे होऊन काळा म्हणाला, ’मित्रा खरे...

काळ्या मातीमधली कविता काळीच असणे बरे.’

आगळ्या वेगळ्या रंगांचे हे विचार नानारंगी

ऐकून झाली फुलपाखराची कविता अनेकरंगी

तेव्हापासून फुलपाखरावर सगळे रंग दिसले

आपापली कविता वाचत पंखावरती बसले !

« PreviousChapter ListNext »