Bookstruck

प्रस्तावना 2

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
बोधिसत्त्व.

बोधि म्हणजे लोककल्याणाच्या तत्त्वानें ज्ञान. त्या ज्ञानासाठीं जो सत्त्व म्हणजे प्राणी सतत प्रयत्‍न करतो, तो बोधिसत्त्व. शाक्यमुनि गौतमाला बुद्धपद प्राप्‍त होण्यापूर्वी पुष्कळ ठिकाणी बोधिसत्त्व म्हणण्यांत आलें आहे. हळुहळू पूर्वजन्मींहि तो बोधिसत्त्व होता अशी कल्पना अस्तित्त्वांत आली; आणि त्या काळी प्रचारांत असलेल्या ह्या कथांना अहिंसात्मक स्वरूप देऊन त्या त्याच्या पूर्वजन्मींच्या कथा समजण्यांत येऊ लागल्या.

दान, शील, नैर्ष्कम्य, प्रज्ञा, वीर्य, क्षांति, सत्य, अधिष्ठान, मैत्री व उपेक्षा ह्या दहा पारमितांच्या योगें लोकोद्धारासाठीं बोधिसत्त्व सतत प्रयत्‍न करून बुद्ध होतो, व मोक्षाला जातो. पारमिता म्हणजे पारंगतता, बीजरूपानें हे दहा गुण सर्व प्राण्यांत आहेतच. परंतु त्यांचा जे विकास करतात, तेच बोधिसत्त्व होतात. मुलांनो, ह्या गुणांचा विकास करून ह्याच जन्मीं तुम्हाला बोधिसत्त्व होतां येणें शक्य आहे; अनेक प्राण्यांचे जन्म घेण्याची गरज नाहीं. तेव्हां अशा सद्गुणांची तुम्ही हेळसांड न करितां ह्या पारमिता संपादण्याचा सतत प्रयत्‍न करा.
« PreviousChapter ListNext »