Bookstruck

प्रस्तावना 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
३ नैर्ष्कम्यपारमिता

तुमचें शील परिपूर्ण होण्यासाठीं तुम्हास एकान्ताची गोडी लागली पाहिजे. एकान्तवासांत बसून प्रथमतः तुमचें शरीर किती अपवित्र पदार्थांनीं भरलें आहे हें पाहण्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. खाटकाच्या दुकानांत टांगलेले मांसाचे तुकडे, एका बाजूला पडलेली आंतडी, स्मशानांत पडलेलीं माणसांची हाडें पाहून तुम्ही कंटाळतां. पण हे सर्व पदार्थ तुमच्या ह्या अमंगल शरीरांतच आहेत ह्याची तुम्हाला जाणीव आहे काय ? जर नाहीं, तर ती करून घेण्याचा तुम्ही सतत प्रयत्‍न केला पाहिजे. जेथें जेथें मांस, आंतडीं आणि हाडें तुम्हास पाहावयास सांपडतील, तेथें तेथें तीं नीट रीतीनें पाहून हेच पदार्थ आपल्या देहांत आहेत ह्याचे ध्यान केलें पाहिजे; हे आंतील पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत.

ह्या ध्यानानें शरीराचा वीट येणें संभवनीय आहे. परंतु बुद्धादिक थोर पुरुषांनी अशा देहाचा किती चांगला उपयोग केला ह्याचें चिंतन केलें असतां तो नष्ट होईल व सत्कार्यांत तुमचें पाऊल पुढें पडेल. ह्यासाठींहि तुम्हाला एकान्त पाहिजे. एकान्ताची गोडी धरणें व त्यांत पूर्णत्व संपादणें यालाच नैर्ष्कम्यपारमिता म्हणतात.

« PreviousChapter ListNext »