Bookstruck

प्रस्तावना 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
५ वीर्यपारमिता

वीर्य म्हणजे सत्कर्में करण्याचा उत्साह. त्यांत पारंगत होणें याला वीर्यपारमिता म्हणतात. तुम्ही जर आळशी झालां, तर बोधिसत्व होण्याचें राहूं द्या, पण नुसता पोटापाण्याचा धंदाहि करूं शकणार नाहीं. आळशाला प्रज्ञा कशी मिळणार ? आणि त्यांचे शील तरी कसें शुद्ध राहील ? निजेची आणि गप्पागोष्टींची आवड, व आत्मविश्वासाचा अभाव, या दोन गोष्टीमुळें आळस उत्पन्न होतो. पण लक्ष्यांत ठेवा कीं, हा निजेचा समय नाहीं. तरुणपण जर तुम्हीं निजेंत घालविलें, तर पुढें मोठा पश्चात्ताप करण्याची तुमच्यावर पाळी येईल. गप्पागोष्टी आणि नाटकें तमाशें तुम्हाला आवडतात; परंतु त्यांचा परिणाम काय ह्याचा तुम्ही विचार केला नाहीं. ह्या क्षणिक सुखाच्या नादीं लागून तुम्ही मोठ्या सुखाला आंचवत आहां; विद्याभ्यासांत तुमचें पाऊल मागें पडत आहे; व सर्वथैव लोककल्याणाच्या कामीं तुम्ही निरुपयोगी बनत चालला आहां.

आतां तुम्ही म्हणाल कीं, ''आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या हातून लोककल्याण तें काय होणार ? तेव्हां निजेंत, गप्पागोष्टींत किंवा नाटकेंतमाशांत मिळणारें अल्पस्वल्प सुख कां सोडा ?'' अशा रीतीनें स्वतःचा तिरस्कार करणें केव्हांहि योग्य होणार नाहीं. प्राचीन बोधिसत्त्वहि तुमच्या आमच्या पेक्षांहि दुर्बल प्राणी होते. परंतु केवळ आपल्या सदुद्योगानें त्यांनी बोधि मिळविली. तुम्ही तर सर्वावयवसंपन्न आहां, आणि आपलें हिताहित जाणण्याचें शहाणपण तुमच्या अंगीं आहे. मग असल्या हलक्यासलक्या ख्यालीखुशालींत वेळ न दवडतां आत्मोन्नतीचा उत्साह वाढविणें तुम्हास शक्य नाहीं काय ?
« PreviousChapter ListNext »