Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
९. खरें कारण समजलें म्हणजे भांडण मिटतें.

(मालुत जातक नं. १७)


एकदां बोधिसत्त्व तपस्वी होऊन एका टेंकडीच्या पायथ्याशीं रहात होता. त्या वेळीं त्या पर्वताच्या एका गुहेंत एक सिंह आणि एक वाघ परस्परांशीं स्नेहभावानें वागून वास करीत असत. पण एके दिवशीं थंडीसंबंधानें त्यांचे भांडण जुंपलें. वाघाचें म्हणजें 'थंडी कृष्णपक्षांत वाढत असते' असें होतें. सिंह 'थंडी शुक्लपक्षांतच वाढते' असें म्हणे. त्या दोघांचेंहि भांडण विकोपास जाण्याच्या बेतांत आलें. तेव्हां ते दोघे बोधिसत्त्वाजवळ जाऊन त्याला म्हणाले ''भो तापस, आमच्या ह्या भांडणाचा निकाल कर.''

बोधिसत्त्व त्याचें भांडण कशा संबंधानें होतें हें समजावून घेऊन म्हणाला ''कृष्णपक्ष असो किंवा शुक्लपक्ष असो, ज्या वेळीं वारा वाहत असतो त्या वेळी थंडी वाढत असते. कां कीं थंड वारा हेंच थंडीची अधिक बाधा होण्याचें कारण होय. तेव्हां कांहीं अंशी आपणां दोघांचें म्हणणें खोटें नाहीं. ह्या भांडणांत कोणाचाहि पराजय झाला नाहीं असें मी समजतों.''

बोधिसत्त्वाच्या उपदेशानें त्या दोघांनी तुटूं पाहणारी मनें पुनः मिलाफ पावलीं.

ज्या गोष्टीसंबंधानें वाद होतो तिचें खरें कारण समजलें असतां किती तरी भांडणें मिटतील !
« PreviousChapter ListNext »