Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१४. असभ्यतेनें हानि.

(नच्चजातक नं. ३२)

प्राचीन काळीं प्रथम कल्पांत चतुष्पद प्राण्यांनी सिंहाला आपला राजा केलें. माशांनी आनंद नांवाच्या मत्स्याला, व पक्ष्यांनीं सुवर्णराजहंसाला आपला राजा केलें. त्या सुवर्णराजहंसाची एक अत्यंत सुंदर कन्या होती. तिनें बापाच्या सांगण्यावरून असा वर मागितला कीं स्वयंवर करून जो पति योग्य वाटेल तो मी वरीन. त्याप्रमाणें हंस राजानें हिमालयावर पक्ष्यांचा मोठा समुदाय बोलाविला. एका मोठ्या शिलातलावर सर्व पक्षी गोळा झाले. तेव्हां हंसराजा आपल्या मुलीला म्हणाला, ''ह्या पक्षिसंघांतून तुला जो नवरा रुचेल, तो निवडून काढ. तिनें मोराला पसंत केलें. तेव्हां सर्व पक्षी त्याजपाशीं येऊन त्याला म्हणाले, ''तूं धन्य आहेस. राजकन्येनें एवढ्या पक्षिसंघांतून तुझीच निवड केली ह्याबद्दल तुझें आम्हीं अभिनंदन करतों.''

''परंतु ह्यावरून माझें सामर्थ्य तुमच्या लक्षांत येणें शक्य नाहीं. मला नृत्यकला किती चांगली येतें हें पहा.'' असें म्हणून त्या पक्षिसमुदायासमोर आपला पिसारा पसरून मोर नाचूं लागला, व त्यायोगें नागडा उघडा पडला. सुवर्णराज हंसाला लाज वाटली, व तो म्हणाला, ''ह्याचा आवाज फार चांगला, पृष्ठभाग सुंदर, वैडूर्य मण्यासारखी मान, आणि लांब पिसारा, परंतु ह्याच्या ह्या निर्लज्ज नाचण्यानें माझ्या मुलीशीं ह्याचा विवाह करण्यास मी तयार नाहीं.''

असें म्हणून त्यानें त्याच ठिकाणी आपल्या भाच्याशीं आपल्या कन्येचा विवाह केला. मोरानें अत्यंत लाजून तेथून पलायन केलें. असभ्यतेमुळें चांगले गुण व्यर्थ गेले !
« PreviousChapter ListNext »