Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 49

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
बिचारा पापक चांगल्या नांवाच्या मंगलत्वाविषयीं जवळ जवळ निराश होऊन तसाच पुढें चालला. शहराच्या बाहेर गेल्यावर कांहीं अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक गृहस्थ त्याच्या पाहण्यांत आला. पापकानें त्याला त्याचें नांव विचारिलें, तेव्हां तो म्हणाला, ''माझें नांव पंथक (वाटाड्या).''

''तर मग तुम्ही या निर्जन प्रदेशांत काय करितां ?'' मी वाट चुकल्यामुळें इतस्ततः भटकत आहें. मला अद्यापि माझा मार्ग सांपडला नाहीं.''

''पण पंथक (वाटाड्या) वाट चुकतो हें कसे ? आहो हें केवळ नांव आहे. वाट चुकण्याचा आणि याचा कांहींच संबंध नाहीं. तुम्हीं नांवावर भरंवसा ठेवणारे वेडगळ मनुष्य दिसतां !''

पापक चांगल्या नांवाच्या गुणांविषयीं पूर्ण निराश झाला व आपलें नांव बदलण्याचा बेत त्यानें रहित केला. तेथून आपल्या गुरूजवळ जाऊन घडलेलें सर्व वर्तमान त्यानें त्याला निवेदन केलें. त्याच्या सोबत्यांनीं पापकानें कोणतें नांव शोधून आणलें आहे असा बोधिसत्त्वाला प्रश्न केला. तेव्हां तो त्याला म्हणाला ''जीवक मरतो, धनपालीला दारिद्र्य येतें, व पंथक वाट चुकतो, हें पाहून आमचा पापक चांगल्या नांवाचा थांग लागल्यावाचून परत आला.*'' पापकाचें तेंच नांव कायम राहिलें हें निराळें सांगावयास नकोच.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा--
जीवकं च मतं दिस्वा धनपालिं च दुग्गतं ।
पन्थकं च मने मूळहं पापको पुनरागतो ॥
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
« PreviousChapter ListNext »