Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 84

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
हा हितोपदेश ऐकून तो लठ्ठ डुकर घाबरून गेला. हत्ती त्याने पाहिला होता. पण हत्तीचें गंडस्थळ एवढासा सिंह फोडून टाकतो ही गोष्ट त्याला माहीत नव्हती. आतां वृद्ध डुकराच्या उपदेशानें त्याचे डोळे उघडले आणि त्याला शरण जाऊन तो म्हणाला, ''मीं हें धाडसाचें कृत्य केलें खरें, परंतु यांतून पार पडण्याचा उपाय कोणता ? मी आजच येथून पळून जाऊं कीं काय ?''

ते वृद्ध डुकर म्हणाले, ''पळून जाण्यानें या प्रश्नाचा निकाल लागणार नाहीं. सर्व डुकर या आठवड्यांत पोराबाळांना घेऊन दुसरीकडे जाऊं शकणार नाहींत आणि जरी गेले तरी त्यांना गाठून सिंह सर्वांचा फन्ना उडवून देईल. तेव्हां आतां तूं असें कर कीं, या ॠषींच्या शौचकूपांत जाऊन लोळ आणि पुनः सर्व दिवस अंग वाळल्यावर दुसर्‍या दिवशीं तसाच लोळून अंगाला विष्टेचीं चांगलीं पुटें दे व ठरलेल्या दिवशी तळ्याच्या कांठीं जाऊन वार्‍याच्या उलट्या दिशेला रहा. परंतु तेथें जाण्यापूर्वी दंवानें आपलें अंग ओलें करण्यास विसरूं नकोस.''

त्या तरुण डुकरानें वृद्ध डुकराचा उपदेश सव्याज पाळला. दुसरा धंदा न करतां सात दिवसपर्यंत शौचकुपांत लोळून आठव्या दिवशीं पहांटेस दंवाने आपलें अंग भिजवून ठरलेल्या ठिकाणीं आपल्या अंगाचा वारा सिंहावर जाईल अशा बेतानें तो उभा राहिला. सिंह डुकराचें मांस कसें असतें याची रुची घेण्याची आज संधी मिळेल असा विचार करीत त्या स्थळीं आला. पण डुकराच्या अंगाची अशी घाण सुटली होती कीं, त्याच्या आसपास जाणें मुळींच शक्य नव्हतें. तो दूर अंतरावर उभा राहिला. त्याला पाहून मोठ्या शौर्याचा आव आणून डुकर म्हणाला, ''कायरे इतका दूर कां उभा राहतोस. असा जवळ ये म्हणजे एकदम युद्धाला सुरुवात करूं.''

सिंह म्हणाला, ''बाबारे, तूं ही उत्तम युक्ती शोधून काढली आहेस, तुझ्या अंगाचा एवढा दुर्गंध सुटला आहे कीं, तुला पायानें देखील शिवण्यास मी धजणार नाहीं मग तुझ्या अंगाचा चावा घेण्याची गोष्ट बाजूसच राहिली ! आतां मी पराजित झालों असें तूं खुशाल म्हण मी आपखुषीनेंच तुला जय देतों. नीचाशीं लढण्यापेक्षां पराजय पतकरलेला बरा !''

असें म्हणून सिंह तेथून निघून गेला आणि हा डुकर बचावल्याबद्दल सर्व डुकरांना आनंद झाला. इतकेच नव्हे, सिंहाचा पराजय करण्याचें नवीन साधन त्यांच्या हातीं आल्यामुळें त्यांना सिंहाचें भय वाटेनासें झालें.
« PreviousChapter ListNext »