Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 97

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
७४. लंगडा गुरू.

(गिरिदंतजातक नं. १८४)


एका कालीं वाराणसींत साम नांवाचा राजा राज्य करीत होता. आणि आमचा बोधिसत्त्व त्याचा प्रधान होता. राजाला अत्यंत उत्तम घोडा आणून नजर करण्यांत आला. तो जरी उत्तम जातीचा होता तथापि चांगला शिकलेला नव्हता म्हणून गिरिदंत नांवाच्या अश्वशिक्षकाच्या स्वाधीन त्याला करण्यांत आलें. गिरिदंत लंगडा होता, तो घोड्याचा लगाम धरून पुढें चालला असतां लंगडत लंगडत चालत असे. कांहीं दिवसांनीं घोडाहि लंगडूं लागला. घोड्याच्या पायाला रोग झाला असावा असें वाटून सर्व अश्ववैद्यांला बोलावून परीक्षा करविली. पण चिकित्सेअंती घोड्याला कोणताच रोग नाहीं असे ठरलें. तेव्हां राजा मोठ्या काळजींत पडला. इतका चांगला घोडा आपणांस मिळाला असून तो थोडक्यांच दिवसांत लंगडा होऊन बसावा याबद्दल राजाला फार वाईट वाटलें. तें पाहून बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आपण काळजी करूं नका. मी या संबंधानें नीट विचार करून घोड्याच्या रोगाचें कारण शोधून काढतों.''

त्या दिवसापासून बोधिसत्त्वानें घोड्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेविली. गिरिदंत जेव्हां लगाम हातांत धरून पुढें जाऊं लागला, तेव्हां त्याच्या मागोमाग घोडादेखील त्याच्यासारखा लंगडत चालूं लागला. तें पाहिल्याबरोबर बोधिसत्त्वाच्या डोक्यांत लक्क प्रकाश पडला. तो राजाजवळ जाऊन म्हणाला, ''महाराज घोड्याला कोणताही रोग नाही. लंगडे गुरुजी आपणाला चालण्याचें कौशल्य शिकवीत आहेत असें वाटून घोडाहि लंगडत आहे. दुसरा एखादा सर्व अवयवसंपन्न शिक्षक मिळाला असतां हा घोडा लंगडण्याची दुष्ट खोड सोडून देऊन नीट चालूं लागेल.''

राजानें बोधिसत्त्वाच्या सल्ल्याप्रमाणें दुसरा शिक्षक ठेविला. तो जातिवंत घोडा नवीन शिक्षकाची चाल पाहून आपणहि नीट चालूं लागला.
« PreviousChapter ListNext »