Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 106

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
८१. अकाल भाषणानें हानि.

(कच्छपजातक नं. २१५)


एकदां बोधिसत्त्व वाराणसीराजाच्या अमात्याचें काम करीत असे. राजा जरा फाजील बडबड करणारा होता. संधि साधून त्याची ही खोड मोडण्याचा विचार बोधिसत्त्वाच्या मनांतून होता. परंतु अशी संधि सांपडेना.

हिमालयावरील दोन तरुण हंस एका सरोवरांत येऊन चारा खात असत. तेथें त्यांची व एका कांसवाची मैत्री जडली. एके दिवशीं कासव त्याला म्हणाला, ''तुमचा हिमालय प्रदेश कसा काय असतो ?''

हंस म्हणाले ''हिमालयाची शोभा काय वर्णावी ? तेथें सर्व कांहीं विपुल आहे शिवाय पारध्याचें आणि मासे मारणार्‍या कोळ्याचें भय बाळगावयास नको. आम्हांला तेथें कमतरता आहे. म्हणून आम्हीं तेथें येत नसतों. केवळ दूरचे देश पहावे याच हेतूनें प्रथमतः आम्हीं येथें आलों. आतां तुझी दोस्ती जडल्यामुळें तुला भेटण्यासाठीं आम्हीं वारंवार येत असतों.''

कांसव म्हणाला, ''तर मग मलाच घेऊन तुम्ही तिकडे जाना. मी मंदगति असल्यामुळें मला येथें एखादा कोळी पकडून नेईल अशी भीति वाटते. रात्रंदिवस साशंक वृत्तीनें काळ कंठावा लागतो, तेव्हां मला तेथें नेल्यास माझ्यावर फार उपकार होतील.''

हंस म्हणाले, ''आम्ही तुला सहज घेऊन जाऊं, परंतु तुला चोंचीनें पकडतां येणे शक्य नाहीं म्हणून आम्हीं एक दांडकें दोन्ही टोंकाला धरतों, व त्याच्या मध्याला तूं दातानें धर. परंतु या कामीं तुला मोठी सावधगिरी ठेवावी लागेल. आकाशपथांतून वेगानें जात असतां तूं जर कांही बोललास, तर तोंडातून काठी सुटून खालीं पडशील आणि प्राणाला मुकशील.''

कांसव म्हणाला, ''माझाच नाश करून घेण्याएवढा मी मूर्ख नाहीं. पण तुम्हीं मात्र अनुकंपा करून दांडकें निसटून न जाईल अशी खबरदारी घ्या.''

हंसांनीं ही गोष्ट कबूल केल्यावर कांसव एका काठीस धरून राहिला व त्या काठीच्या दोन्ही टोंकाला धरून हंस त्याच्यासह आकाशांतून जाऊं लागले. कांसवाला आपणाला हंस वाहून नेतात याबद्दल थोडासा गर्व वाटला. इतक्यांत वाराणसींतील मुलें क्रीडांगणांत जमलीं असतां त्याला पाहून मोठ्यानें ओरडून म्हणालीं ''पहा हो पहा ! दोन सुंदर हंस या बेट्या ओबड धोबड कांसवाला घेऊन चाललें आहेत !''

हें ऐकून कांसवाला फार संताप आला आणि तो म्हणाला, ''काय बेटीं द्वाड पोरें''-

पण हें वाक्य संपतें न संपतें तों काठी तोंडातून सुटल्यामुळें तो गच्चीवर आदळून छिन्नविछिन्न झाला. काय गडबड आहे हें पहाण्यासाठीं राजा बोधिसत्त्वाला आणि इतर अमात्यांला बरोबर घेऊन गच्चीवर गेला आणि घडलेला प्रकार पाहून बोधिसत्त्वाला म्हणाला, ''भो पंडित, हंसाच्या तोंडांतून सुटून या कांसवाची अशी दुर्दशा कां व्हावी ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, आपणाला हंस वाहून नेतात याबद्दल कांसवाला गर्व झाला असावा, इतक्यांत क्रीडांगणांतील मुलांची ओरड त्याच्या कांनीं गेली असावी. त्यांना उत्तर देण्यासाठीं वेळ काळ न पहातां तोंड उघडल्यामुळें काठी तोंडांतून सुटून कांसवाची ही गत झाली असली पाहिजे ! यापासून आम्हीं असा धडा शिकला पाहिजे कीं, भलत्याच वेळीं संभाषण करून आपला नाश करून घेऊं नये.''

बोधिसत्त्व आपणाला उद्देशून बोलत आहे असें जाणून राजा त्या दिवसापासून सावध झाला आणि त्यानें अवेळीं भाषण करून आपलें नुकसान करून घेतलें नाहीं.
« PreviousChapter ListNext »