Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 115

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
८७. मरण पावलेल्या दुष्टांचें भय.

(महापिंगलजातक नं. २४०)


प्राचीन काळीं वाराणसीमध्यें महापिंगल नांवाचा राजा राज्य करीत असे. तो अत्यंत दुष्ट होता. कोणालाहि त्यानें चांगल्या रीतीनें वागविले असें कधींहि घडलें नाहीं. त्याचा मुलगा मात्र अत्यंत सुशील होता. कां कीं, कांहीं पूर्वपुण्याईमुळें आमचा बोधिसत्त्वच पुत्ररूपानें त्याच्या कुळांत जन्माला आला होता. बोधिसत्त्वाला आपल्या पित्याचा स्वभाव आवडत नसे. तथापि निरुपायामुळें बापाला दुष्ट कृत्यांत अडथळा करितां येणें शक्य नव्हतें. कांहीं काळानें महापिंगल मरण पावला. त्यावेळीं काशीराष्ट्रवासी जनानें दुप्पट उत्सव केला; एक महापिंगल मेल्याबद्दल व दुसरा बोधिसत्त्व गादीवर आल्याबद्दल. राज्यलाभ झाल्यावर बोधिसत्त्व पित्याच्या प्रासादांत जाऊन राहिला. तेथून बाहेर पडत असतां तेथील द्वारपाळ रडत होता. तो त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हां त्याला वाटलें कीं, हा एवढाच काय तो आपल्या पित्याचा खरा भक्त असावा. कां कीं, पित्याच्या मरणानें सर्व लोक संतुष्ट झाले असतां हाच काय तो शोक करीत आहे ! तेव्हां बोधिसत्त्व त्याला म्हणाला, ''रे द्वारपाला माझ्या पित्याच्या मरणामुळें शोक झाला आहे असा काय तो तूं एकटाच मनुष्य मला सांपडलास. माझ्या पित्यानें तुझ्यावर असे कोणते उपकार केले होते बरें, कीं ज्यांच्यायोगें तुला त्यांच्या वियोगानें एवढें दुःख होत आहे !''

द्वारपाळ म्हणाला, ''महाराज पिंगल राजा येथून जात येत असतांना माझ्या डोक्यावर आठ आठ काठ्या मारीत असे. त्यामुळें मला फार वेदना होत असत. नुकताच मी या दुःखांतून मुक्त झालों आहे. परंतु मला अशी भीति वाटते कीं, आमचा जुना मालक मृत्यूच्या दरबारींहि अशीच दांडगाई करील, आणि यमराजा त्याला तेथून हाकलून देईल; व पूर्वीप्रमाणें माझ्या डोंक्यावर तो काठ्या मारीत बसेल !''

हें त्याचें भाषण ऐकून बोधिसत्त्वाला सखेद आश्चर्य वाटलें ! आणि त्या द्वारपाळाचें समाधान करून तो म्हणाला, ''माझा पिता आपल्या कर्मांप्रमाणें इहलोकांतून निघून गेला आहे. तो त्याच शरीरानें परत येईल अशी भीति बाळगण्याचें कांहीं कारण नाहीं. का कीं त्याचें शरीर सर्व लोकांसमक्ष जाळून भस्म केलें आहे !''

बिचार्‍या साध्या भोळ्या द्वारपाळाला बोधिसत्त्वाच्या उपदेशानें समाधान वाटलें, आणि त्यानें आपला शोक सोडून दिला.
« PreviousChapter ListNext »