Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 117

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
असें म्हणून एक हजार कार्षापणाची थैली गुरूच्या पायांपाशीं ठेवून राजकुमारानें पुनः गुरूला नमस्कार केला. त्याकाळीं आचार्याला दक्षिणा देऊन शिकणारे आणि आचार्याची सेवा करून शिकणारे असे दोन प्रकारचे शिष्य असत. त्यांना अनुक्रमें आचार्यभागदायक आणि धर्मांतेवासिक असें म्हणत असत. धर्मांतेवासिक दिवसा आचार्याची सेवा करून रात्रीं अध्ययन करीत असत. आणि आचार्यभागदायक वडील मुलाप्रमाणें सगळा दिवस फावल्या वेळीं अध्ययनच करीत असत.

तो आचार्य रोज आपल्या शिष्यांना घेऊन नदीवर स्नानासाठीं जात असे. एके दिवशीं रस्त्यांत एका बाईनें तिळांची वरील टरफलें काढून ते वाळत टाकले होते. वाराणसीच्या राजकुमाराला ते स्वच्छ पांढरे तीळ पाहून लाळ सुटली, व त्यानें हळुच एक मूठ मारून तोंडांत टाकली ! म्हातारी हें कृत्य पाहून मुलगा जरा लोभी आहे असें म्हणून चुप राहिली. पुनः दुसरे दिवशीं आणि तिसरे दिवशींहि राजकुमारानें हाच प्रकार केला.

तेव्हां म्हातारी क्रोधावेग सहन करण्यास असमर्थ होऊन हा प्रसिद्ध आचार्य आपल्या शिष्याकडून माझे तीळ लुटवितो असें मोठ्यानें ओरडली. आचार्यानें मागें वळून काय घडलें याची चौकशी केली. म्हातारीनें घडलेला सर्व प्रकार निवेदन केला. तेव्हां आचार्य म्हणाला, ''बाई तूं याजबद्दल वाईट वाटूं देऊ नकोस. जी काय तुझी हानी झाली असेल तेवढी किंमत तुला देण्यांत येईल.''

म्हातारी म्हणाली, ''महाराज, एवढ्या तिळांची किंमत घेऊन मला काय करावयाचें ? पण हा मुलगा पुनः माझे तीळ खाणार नाहीं याबद्दल खबरदारी घ्या म्हणजे झालें.''

आचार्य म्हणाला, ''आतांच्या आतां त्याला मी शिक्षा करतों.''

असे म्हणून आचार्यानें दोघा मुलांकडून त्या राजकुमाराला पकडून आणून त्या म्हातारीच्या पुढें उभें केलें, आणि त्याच्या पाठीवर जोरानें तीन छड्या ओढिल्या. राजकुमाराचें मन इतकें संतप्‍त झालें कीं, आचार्याचा सूड कधीं उगवीन असें त्याला होऊन गेलें. उपाय न सांपडल्यामुळें खालीं मान घालून मुकाट्यानें तो गुरुगृहीं चालता झाला. राजपुत्र आपणावर मनांतल्या मनांत रागावला आहे ही गोष्ट आचार्याला देखील समजली. परंतु आपलें कर्तव्य आपण केलें आहे, असें जाणून त्याला त्याची मुळींच पर्वा वाटली नाहीं. कांहीं दिवसांनीं अध्ययन पुरें करून राजकुमार वाराणसीला जाण्यास निघाला त्या प्रसंगीं गुरूची आज्ञा घेण्यास गेला असतां तो गुरूला म्हणाला, ''गुरूजी, आपले माझ्यावर फार फार उपकार आहेत. यदा कदाचित वाराणसीचें राज्यपद मला मिळालें तर आपण एकवार वाराणसीला यावें अशी माझी नम्र विनंती आहे.''

आचार्य म्हणाला, ''परंतु मला येथें पुष्कळ कामें आहेत. पुष्कळ शिष्यांचें अध्ययन मजवर अवलंबून आहे. तेव्हां माझ्यानें वाराणसींपर्यंत जाणें कसें शक्य होईल ? तथापि राजकुमारानें फार आग्रह केल्यामुळें राज्यपदारूढ झाल्यावर एकवार तुझी भेट घेईन असें आचार्यानें त्याला वचन दिलें. राजकुमार वाराणसीला गेला तेव्हां वाराणसी राजाला फार आनंद झाला. अनुक्रमानें मुलाची सर्व विद्येंत पारंगतता पाहून संतुष्ट झाला आणि आपल्या अमात्यांना म्हणाला, ''माझा मुलगा विद्याविनय संपन्न आहे. त्याला सिंहासनावर बसवून मीं विश्रांती घ्यावी हें मला योग्य आहे. तुम्ही त्याच्या अभिषेकाची तयारी करा.''
« PreviousChapter ListNext »