Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 126

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
९५. क्षमा साधूचें शील.

(महिसजातक नं. २७८)


आमचा बोधिसत्त्व एका जन्मीं वनमहिष होऊन अरण्यांत रहात असे. तेथें एक दुष्ट माकड येऊन त्याला फार त्रास देई. त्याच्या कानांत शेंपूट घालून तो गुदगुल्या करी; शिंगाला लोंबकळत राहून आणि तीं हालवून त्याचें कपाळ दुखवी; त्याच्या पाठीवर देहधर्म करी; आणि अशाच अनेक माकडचेष्टांनीं त्याचा पिच्छा पुरवी. परंतु बोधिसत्त्वानें त्याला कांहीं एक अपाय केला नाहीं, एवढेंच नव्हे, त्याच्याविषयीं आपल्या मनांत सूड उगविण्याचा विचार देखील उत्पन्न होऊं दिला नाहीं. पण त्या माकडाचें कृत्य त्या अरण्यांत रहाणार्‍या वनदेवतेला सहन झालें नाहीं, आणि ती बोधिसत्त्वाला म्हणाली. ''भो महिष, अशा या दुष्ट वानराला तूं सलगी दिली आहेस हें मला मुळींच आवडत नाहीं. तूं जें याच्याकडून घडणारें दुःख सहन करतो आहेस त्यापासून तुला फायदा कोणता ? मला तर असे वाटतें कीं, तुझ्या या शांतीचा फायदा घेऊन तो तुला दुःख देईलच परंतु तुझ्यासारख्या इतर प्राण्यालाहि दुःख देण्यास त्याला उत्तेजन मिळेल ! तेव्हां याला शिंगानें खालीं पाडून पोटावर पाय देऊन याच्या आंतड्या बाहेर काढ ! हें काम करणें तुला मुळींच कठीण नाहीं.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''भो देवते, माझ्या अंगीं सामर्थ्य आहे, म्हणून मी जर याचा सूड उगवला, तर माझा मनोरथ सिद्धीस कसा जाईल ? आपले दुष्ट मनोविकारांवर जो ताबा चालवतो, तोच खरा शूर होय. तेव्हां हा जो मला दुःख देत आहे तो माझा मित्रच असें मी समजतों. माझें धैर्य आणि सहनशीलपणा तो कसोटीला लावून पहात आहे ! आणि हे गुण मी याच्या माकडचेष्टांनीं भंग पावूं देणार नाहीं. आतां माझ्या या कृत्यामुळें तो दुसर्‍या प्राण्यांला त्रास देईल असें तुझें म्हणणें आहे. पण यावर एवढेंच सांगावयाचें आहे कीं, सर्वच प्राणी क्षमाशील असतात असें नाहीं, दुसरा एखादा तापट प्राणी सांपडला म्हणजे याच्या कृत्याचें फळ याला आपोआप मिळेल.''

असें बोलून बोधिसत्त्व त्या अरण्यांतून निघून दुसरीकडे गेला.

कांहीं दिवसांनीं तेथें दुसरा एक वनमहिष आला. माकडानें त्याच्याशींहि दांडगेपणा करण्यास आरंभ केला. पण पहिल्याच दिवशीं त्या महिषानें शिंगानें माकडाला खालीं पाडून पाय देऊन त्याच्या पोटांतील आंतडें बाहेर काढलें !

« PreviousChapter ListNext »