Bookstruck

जातककथासंग्रह भाग १ ला 137

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
९४. हिंस्त्र प्राण्याची कृतज्ञता.

(जबसकुणजातक नं. ३०८)


एके दिवशीं मांस खात असतां एका सिंहाच्या घशांत हाड अडकलें; तें कांहीं केल्या निघेना. सिंह वेदनांनीं पीडित होऊन मोठमोठ्यानें आरडूं ओरडूं लागला. गळा सुजून मोठा झाला. अशा स्थितींत एक चिमुकला पक्षी त्याला पाहून त्याच्याजवळ जाऊन म्हणाला, ''भो मृगराज, तूं असा विव्हळ कां झाला आहेस ?''

सिंह म्हणाला, ''बाबारे, तुला माझ्या दुःखाची कहाणी सांगून काय उपयोग ? माझ्या घशांत हाड अडकल्यामुळें माझ्यानें बोलवत देखील नाहीं. मग खाण्याची गोष्ट बाजूला राहिली !''

पक्षी म्हणाला, ''तुम्ही जर मला अभयदान द्याल, तर मी तुमच्या घशांत अडकलेलें हाड आतांच काढून टाकीन.''

सिंहानें त्याचे फार आभार मानिले आणि त्याला हाड काढण्यास सांगितलें. पक्षी मोठा हुशार होता. न जाणों आपण तोंडांत शिरल्यावर हा आपणाला तेथेंच दाबून टाकील ! अशी भीति वाटून त्यानें सिंहाच्या खालच्या आणि वरच्या जबड्याच्या दरम्यान एक तेवढ्या बेताची काठी उभी करून ठेवली; आणि घशांत शिरून आपल्या चोचीनें तें हाड आडवें पाडलें; तेव्हां तें आपोआपच बाहेर निघालें. पुनः पक्षानें सिंहाच्या जबड्यांमधील काठी काढून तेथून उड्डाण केलें.

दुसर्‍या दिवशीं सिंहानें एका वनमहिषाची शिकार केली, आणि तो त्याच ठिकाणीं बसून त्याचें मांस खाऊं लागला. पक्षीहि सिंहाच्या समाचाराला तेथें आला होता, तो त्याला म्हणाला, ''भो महाराज, आपली प्रकृति साफ बरी झाली असें दिसतें.''

त्यावर सिंह म्हणाला, ''बरी झाली म्हणूनच आज शिकार करून ही मेजवानी चालली आहे !''

पक्षी म्हणाला, ''अशा प्रसंगीं तुम्ही मला विसरणार नाहीं अशी माझी खात्री आहे. कां कीं, कालच मीं तुमच्यावर मोठा उपकार केला आहे.''

सिंह म्हणाला, ''पण त्या उपकाराचें बक्षिसहि मी तुला कालच देऊन टाकलें आहें !''

पक्षी म्हणाला, ''तें कोणतें बरें.''

सिंह म्हणाला, ''हें पहा, मी सर्वथैव प्राण्याची हिंसा करून आपलें पोट भरणारा प्राणी असून तुला माझ्या तोंडांतून जिवंत जाऊं दिलें, हे तुझ्यावर मोठेच उपकार नाहींत काय ? आणखी माझ्याजवळ निराळें बक्षीस मागतोस हा तुझा मोठाच अपराध होय !''

पक्षी म्हणाला, ''आपण म्हणतां ही गोष्ट अगदीं खरी आहे ! ज्या प्राण्यावर उपकार केला असतां अपकार होण्याचा संभव असतो, ज्याला मित्रधर्म काय हें ठाऊक नसतें, अशा प्राण्यापासून प्रत्युपकाराची अपेक्षा न करितां मुकाट्यानें निघून जावें हें बरें !!''

असे उद्‍गार काढून पक्षी तेथून उडून गेला.
« PreviousChapter ListNext »