Bookstruck

जातककथासंग्रह भाग २ रा 1

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१०४. निंबदेवतेचा दूरदर्शीपणा.

(पुचिमंद जातक नं. ३११)

प्राचीन काळीं चोराला निंबाच्या लाकडाच्या सुळावर देण्याची वहिवाट असे. एके दिवशीं एक चोर गांवांत चोरी करून पहांटेला गांवाबाहेरील एका निंबाच्या झाडाखालीं येऊन निजला. त्याला गाढ झोंप लागल्यामुळें तो सूर्योदयापर्यंत तसाच निजून राहिला असतो; परंतु त्या झाडावर राहणारी देवता त्याला जागें करून म्हणाली, ''अरे मूर्ख चोरा, चोरी करून येथे निजून कां राहिलास. तुझ्यामागें गांवांतील लोक लागले असतील, आणि ते जर या ठिकाणीं आले तर तुला पकडून ठार मारतील.''

चोर गडबडून उठून चोरीचा माल घेऊन पळत सुटला ! तें पाहून जवळच्या पिंपळावर रहाणारी अश्वत्थ देवता निंबदेवतेला म्हणाली, ''बाईग, या चोरानें वाईट कर्म केलें असून त्याला जर लोकांनीं पकडलें, तर तुझें त्यांत काय गेलें ? त्याला येथून उठवून घालवून देण्याची उठाठेव करण्याचें काय प्रयोजन ?''

निंबदेवता म्हणाली, ''बाई, अश्वत्थ देवते, तूं यांतलें मर्म जाणत नाहींस ! या चोराला जर लोकांनीं पकडलें, तर त्याला सुळावर देण्यासाठीं लोक माझ्या या झाडाचा संहार करतील अशी मला भीति वाटते ! कां कीं, चोराला पकडून निंबाच्या लांकडाच्या सुळावर चढविण्याची या देशांत वहिवाट आहे.''

हें त्या देवतेचें संभाषण संपलें नाहीं तोंच गांवांतील लोक चोराचा पाठलाग करीत त्या ठिकाणीं आले, आणि तेथें पडलेल्या कांहीं वस्तू पाहून चोर येथेंच निजला असावा, अशी त्यांस शंका आली, व ते म्हणाले, जर हा चोर येथें सांपडला असता, तर याच निंबाच्या झाडाचा सूळ करून त्यावर त्याला चढविलें असतें.''

असें परस्परांशीं बोलून ते तेथून निघून गेले. हें त्यांचें भाषण ऐकून अश्वत्थदेवता म्हणाली, ''बाई निंबदेवते, तूं मोठी दूरदर्शी आहेस. हा चोर जर येथेंच निजून राहिला असता, तर त्याच्या बरोबरच तुझ्या या झाडाच्या जिवावरहि कठीण प्रसंग आला असता ! तेव्हां तुझा हा दूरदर्शीपणा अत्यंत स्तुत्य होय.''
« PreviousChapter ListNext »